ताबा रेषेचा आदर करा, अन्यथा...; राजनाथ सिंहांनी चीनला ठणकावलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 September 2020

भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी खडे बोल सुनावले.

नवी दिल्ली- भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी खडे बोल सुनावले. चीनने ताबा रेषेचा आदर करावा तसेच तेथील स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा एकतर्फी बदल करू नये असे ठणकावतानाच त्यांनी भारत स्वतःचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंग यांच्यात शुक्रवारी प्रथमच समोरासमोर चर्चा झाली.

राजनाथसिंह हे सध्या शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी मॉस्कोला रवाना झाले असून येथेच त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये तब्बल दोन तास २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. सीमेवरील कुरापतींवरून भारताने चीनला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. चीनने सीमेवरील विद्यमान स्थिती काळजीपूर्वक हाताळावी, ती आणखी बिघडेल अशी कोणतीही पावले टाकू नयेत, असा सज्जड दम राजनाथ यांनी चिनी संरक्षणमंत्र्यांना भरला. दरम्यान भारताने कानउघाडणी केल्यानंतर देखील चीनचा कांगावा सुरूच आहे. आम्ही एक इंचभर देखील जमीन गमावणार नाहीत, सीमेवर तणाव निर्माण होण्यासाठी भारत जबाबदार असल्याचे चीनने म्हटले आहे.

'चोराच्या उलट्या बोंबा' चीन म्हणते; हक्काची एक इंच जमीनही सोडणार नाही

राजनाथ म्हणाले,

-चिनी सैनिकांचे वर्तन आक्रमक
-चीनने सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविली
-चीनकडून द्विपक्षीय कराराचे उल्लंघन
-भारतीय जवानांनी नेहमी संयम दाखविला
-सीमेवर शांततेसाठी समजूतदारपणा दाखवा
-वाद वाढविणाऱ्या विषयांत अडकू नका
चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो

चीनकडून पाच भारतीय तरुणांचे अपहरण

अरुणाचल प्रदेशातील पाच तरुणांचे चीनच्या लष्कराने अपहरण केले असल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी आज ट्विटच्या माध्यमातून केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे चीनला आता सडेतोड उत्तर द्यायला हवे, अशी मागणी एरिंग यांनी केली आहे. विशेष म्हणजे कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी देखील याला दुजोरा दिल्यानंतर अरुणाचल पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. दुसरीकडे उत्तर सिक्कीममध्ये रस्ता चुकल्याने हरवलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय लष्कराने मदत करत त्यांना खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय मदत देऊन त्यांना योग्यस्थळी नेऊन सोडल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा भारत-चीन संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शविली आहे. उभय देशांतील संबंध हे खूपच बिघडले असून चीन देखील तितकीच आक्रमक भूमिका घेतो आहे, अशा स्थितीमध्ये या दोन्ही देशांतील वाद मिटविण्यासाठी आपल्याला मदत करायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या आपण दोन्ही देशांच्या संपर्कात असून तेथील स्थिती जाणून घेत आहोत असेही त्यांनी नमूद केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Respect the line of possession Rajnath Singh warning to China