रशियाच्या मध्यस्थीला यश; अर्मेनिया-अझरबैजान यांच्यात युद्धविराम

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

रशियाच्या मध्यस्थीनंतर अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी आज युद्धबंदीची घोषणा केली आहे.

मॉस्को- रशियाच्या मध्यस्थीनंतर अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी आज युद्धबंदीची घोषणा केली आहे. नागोर्नो-कारकाबक्श येथे दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मागील दोन आठवड्यांपासून हे दोन्ही देश परस्परांशी झगडत होते, यामध्ये दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी देखील झाली होती. आज दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करत कैद्यांच्या आदानप्रदानीबरोबरच मृत जवानांच्या शोधासाठी परस्परांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या पुढाकाराने मॉस्कोमध्ये दोन्ही देशांत तब्बल दहा तास चर्चा झाली, या चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. हा रशियाचा मोठा राजनैतिक विजय मानल्या जातो, काही दिवसांपूर्वी रशियाने अर्मेनियासोबत सुरक्षा करार केला होता, अझरबैजानशी देखील त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्षाला २७ सप्टेंबर रोजी सुरवात झाली होती. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rrussian mediation successful Ceasefire between Armenia and Azerbaijan