
Ukraine Russia War | रशियन सैन्याला मोठं यश, युक्रेनचं महत्त्वाचं शहर ताब्यात
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. यातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलन्स्की यांनी व्हिडीओ जारी केल्याने युक्रेन माघार घेणार नसल्याचं स्पष्ट झालंय. आम्हाला पळण्यासाठी वाहनं नाही, लढण्यासाठी हत्यारं पाठवा असं, त्यांनी अन्य राष्ट्रांना आवाहन केलंय.दरम्यान, युक्रेनच्या आता दक्षिणेतील आणखी एका मोठ्या शहराचा ताबा घेतला आहे.
रशियन सैन्याने युक्रेनच्या आग्नेय झापोरिझ्झ्या (Zaporizhzhya) प्रदेशातील मेलिटोपोल शहर ताब्यात घेतलं आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. रशियाने आक्रमण सुरू केल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या महत्वाच्या शहरांपैकी हा भाग आहे. भारतीय वेळेनुसार काल म्हणजेच 25 फेब्रुवारीला रशियन सैन्याने मेलिटोपोलमध्ये (Melitopol) प्रवेश केला. स्थानिक गव्हर्नर ऑलेक्झांडर स्टारुख (Oleksandr Starukh) यांच्या माहितीनुसार रशियाचे बॉम्ब अनेक इमारतींवर आदळले आणि रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग सुरू होतं.
सकाळी 10 ते 11 च्या सुमारास, एका मोठ्या हल्ल्यामुळे आग लागली आणि गाड्याही जळून खाक झाल्या. सूत्रांनुसार, स्थानिक सरकारी इमारतीवरही गोळीबार करण्यात आला. यावेळी शहराच्या मुख्य रस्त्यावर रशियन सैन्य फिरत असल्याचे काही कॅमेरा फुटेजेसमध्ये समोर आले.
युद्धादरम्यान, रशियन सैन्याने शहरातील रुग्णालयातही गोळीबार केला. यामध्ये 4 जण ठार झाले. तर 10 जण जखमी आहेत. रशियन सैन्याच्या वाढत्या प्रभावाला तोंड देताना अखेर संपूर्ण शहरातील सरकारी यंत्रणेने आत्मसमर्पण केलं. यानंतर रशियन सैन्याने शहराचा संपूर्ण ताबा घेतला. मेलिटोपोलमध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी छोट्या पातळीवर लढाया सुरू होत्या. काही भागात गोळीबारही सुरू असल्याचे वृत्त आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या शहरात हल्ला केल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी बॉम्बहल्ले देखील केले. शहरातील रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य साधनांवरही हल्ले चढवले. युक्रेन सैन्याची अनेक विमानं आणि तोफखाना नष्ट केला.