पुतीन यांचे कट्टर विरोधक अत्यवस्थ; उपचारांसाठी जर्मनीला हलवण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

कोमात गेलेले रशियातील विरोधी राजकीय नेते अॅलेक्सी नवाल्नी यांना उपचारासाठी जर्मनीत हलविण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे.

मॉस्को - संभाव्य विषबाधेमुळे कोमात गेलेले रशियातील विरोधी राजकीय नेते अॅलेक्सी नवाल्नी यांना उपचारासाठी जर्मनीत हलविण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे. मॉस्कोहून सायबेरियातील टोम्स्क येथे जाणाऱ्या विमानात ते बसले होते. चहा घेतल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे विमान ओम्स्क येथे उतरविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

नवाल्नी यांना आणखी चांगले उपचार मिळावेत म्हणून जर्मनीतील बर्लिन येथील रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली होती. ओम्स्क हे सायबेरियातील शहर आहे, जे बर्लिनच्या पूर्वेस सुमारे चार हजार दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. सहा तासांच्या विमान प्रवासाने तेथे जाता येते. आवश्यक त्या आधुनिक वैद्यकिय सुविधा असलेले विमान सज्ज करण्यात आले, पण नवाल्नी हे हलविता येणार नाहीत असे रुग्ण बनले आहेत, कारण त्यांची प्रकृती अस्थिर आहे, असे रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरांनी सांगितले. 

विषारी द्रव्याबाबत मौन 
नवाल्नी यांच्या शरीरात पोलिसांना अत्यंत धोकादायक विषारी द्रव्याचे अंश सापडले, पण त्याविषयी माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. नवाल्नी यांचे सहकारी इव्हान झडॅनोव यांनी ही माहिती दिली. 

हे वाचा - अमेरिकेत कॅलिफोर्नियात आगीचं तांडव; मुंबईपेक्षा मोठा परिसर जळून खाक

ट्वीटच गायब 
नवाल्नी यांना हलविण्यास रुग्णालयाने मंजुरी दिली नसल्याचे ट्विट त्यांच्या प्रवक्त्या किरा यार्मीश यांनी केले होते. त्यानंतर आता हे ट्विटच गायब झाल्याचा दावा किरा यांनी केला. 

अ‍ॅलेक्सी यांची माहिती देत नसल्याचा आरोप
रुग्णालयात दाखल केल्यानंतर अ‍ॅलेक्सी यांच्या समर्थकांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केले आहेत. अ‍ॅलेक्सी यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अ‍ॅलेक्सी यांचे खाजगी डॉक्टर अ‍ॅनास्टसी यांनाही रुग्णालय प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला आहे. 

हे वाचा - Covid19 Impact : मॅक्रॉन-मार्केल यांचे एकमेकांना ‘नमस्ते’

नवल्नी यांच्यावर आधीही विषप्रयोग?
अ‍ॅलेक्सी नवल्नी यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. तेव्हा तुरुंगात असताना त्यांना विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रशासकीय कारणामुळे तेव्हा नवल्नी यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नवल्नी यांना विषबाधा नाही तर अ‍ॅलर्जीमुळे त्रास झाल्याचं म्हटलं होतं. 

2017 मध्ये अँटीसेप्टीकचा हल्ला 
नवाल्नी यांना अनेक वेळा तुरुंगात टाकण्यात आले असून त्यांचा छळ करण्यात आला आहे. 2017 मध्ये त्यांच्या चेहऱ्यावर अँटीसेप्टीक द्रव्य टाकण्यात आले होते. त्यात त्यांचा डोळ्याला इजा झाली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia doctor says no move alexie navalny to germany for treatment