
Russia Ukraine Crisis : रशियाचा खेरसनवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव
किव्ह : युद्धात रशियाची माघार होत असल्याचे चित्र निर्माण झाले असताना आज रशियाच्या सैनिकांनी खेरसन शहरावर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खेरसनवर काही महिने रशियाचा ताबा होता. रशियाच्या आजच्या हल्ल्यामुळे घाबरून जाऊन नागरिक शहराबाहेर निघून जात आहेत.
युक्रेन आणि रशियाचा यांच्यातील युद्धाचा आजचा ३०८ वा दिवस होता. दरम्यानच्या काळात रशियाचे हल्ले थंडावल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांनी मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. खेरसन प्रांताचा काही भाग रशियाने ताब्यात घेतला होता. या भागाचे रशियात विलिनीकरण झाल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
मात्र, युक्रेनचे हल्ले वाढल्याने रशियाला येथून माघार घ्यावी लागली होती. त्यांनी आज खेरसन शहरासह या प्रांताला लक्ष्य करत रणगाडे आणि क्षेपणास्त्र यांच्या साह्याने जोरदार मारा केला. त्याबरोबरच पूर्व भागात सीमेवरही मोठा दबाव निर्माण केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने आज खेरसनमधील नागरी भागावर तोफगोळ्यांचा मारा केला. त्याबरोबरच ३३ क्षेपणास्त्रे डागत अनेक इमारतींचे नुकसान केले. रशियाने मात्र नागरी भागावर हल्ले केले नसल्याचा दावा केला. या हल्ल्याबरोबरच युक्रेनी सैनिकांच्या ताब्यात असलेल्या बाखमत या शहराच्या सीमेवरही धुमश्चक्री सुरु आहे.
हे शहर रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर संपूर्ण युक्रेनमध्ये हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरन वाजत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिक शहर सोडून जात असून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
समेटाची चिन्हे नाहीत
युद्धाला दहा महिने उलटून गेले तरी युक्रेनमध्ये शांतता निर्माण होण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नसल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. उलट, युक्रेनने आक्रमकपणे आपले भूभाग परत मिळविण्यास सुरुवात केली असल्याने पुन्हा पकड मिळविण्यासाठी दक्षिण दिशेकडून युद्धाला जोर आणण्याचा रशिया प्रयत्न करत आहे, असा दावाही ब्रिटनने केला आहे.
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की हे त्यांची दहा मुद्द्यांची शांतता योजना वारंवार मांडत आहेत. रशियाने युक्रेनचे सार्वभौमत्व मान्य करावे आणि तातडीने संपूर्ण सैन्यमाघार घ्यावी, असा एक मुद्दा त्यात असल्याने रशियाला ही योजना अजिबात मंजूर नाही. आपण वाटाघाटीला तयारआहोत, पण या वाटाघाटी आमच्या अटींवर होतील, असा पवित्रा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी घेतला आहे. त्यामुळे शांतता चर्चेची प्रक्रिया सुरु होण्याचीही चिन्हे नाहीत.