
युक्रेनच्या प्रत्युत्तराने रशियाची पीछेहाट
किव्ह : युक्रेनच्या औद्योगिक केंद्रावर पूर्ण कब्जा मिळविण्यासाठी रशियाचे सैन्य पूर्व डोनबस भागावर आक्रमणाने दबाव आणत आहेत. पण युक्रेनच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे त्यांची पीछेहाट होत असल्याचा दावा युक्रेन व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केला.
डोनबसचा मार्ग साफ होण्यासाठी रशिया डोन्स्तक आणि लुहान्सवर ताबा मिळविण्यासाठी झगडत आहे. या दोन प्रांतांसह क्रिमिया तसेच मारिउपोल या बंदराचा ताबाही रशियाच्या फौजांनी घेतला असल्याचे युक्रेनी सैन्याचे जनरल स्टाफ पदावरील अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. युक्रेनी फौजांनी गेल्या २४ तासांत दोन प्रांतात रशियाचे आठ हल्ले परतवून लावले आहेत, नऊ रणगाडे, १८ चिलखती विभाग, १३ वाहने, तीन तोफखाना यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला. रशियाच्या फौजा पुन्हा एकत्र येत युक्रेनच्या सैनिकी व नागरी वस्तीतील इमारतीवर क्षेपणास्त्र व बाँब हल्ले करीत आहेत, असे जनरल स्टाफ यांनी फेसबुक पेजवरून सांगितले.
पोपासना शहरावर रशियाने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाल्याचे लुहान्स्कचे गोव्हर्नर सेरही हैदई यांनी सांगितले. या शहरातील रस्त्यांवर अनेक आठवड्यांपासून धुमश्चक्री सुरु आहे. बहुमजली इमारती व खासगी निवासस्थानांवर रशियाचे सैनिक सातत्याने गोळीबार करीत आहे, असे हैदई यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. रशियाने गेल्या २४ तासांत हल्ल्यांमध्ये वाढ केली असली तरी युक्रेनकडून देण्यात येणाऱ्या प्रत्युत्तरामुळे शत्रू पक्षाला फारसे यश मिळालेले नाही. युक्रेनच्या खंबीर लढ्यामुळे रशियाला हवाई व जलमार्गाने नियंत्रण मिळविणे अद्याप शक्य झालेले नाही, असे ब्रिटनच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.
युद्ध ४८ तासांत संपणार
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट येत्या ४८ तासांत इस्तंबूलमध्ये होणार असून त्यानंतर या दोन्ही देशांमधील युद्ध संपेल, असा दावा तुर्कस्तानचे अध्यक्ष तैय्यप एर्देगॉन यांनी केला.आम्ही या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.
‘यूएन’चे अध्यक्ष रशियाला जाणार
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस हे मंगळवारी (ता. २६) रशियाला भेट देणार आहेत. मॉस्को येथे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती ‘यूएन’चे प्रवक्त्याने दिली. गुटेरेस हे गुरुवारी (ता.२८) युक्रेनला जाणार असून अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेणार असल्याचे ‘किव्ह इंडिपेंडंट’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
तैवानची युक्रेनला मदत
तैवानने युक्रेनचे समर्थन करीत सुमारे ८० लाख डॉलरची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. या निधीतून युक्रेनमध्ये रुग्णालय आणि वैद्यकीय सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी होणार आहे.
Web Title: Russia Retreat Response Ukraine British Officials Claim Eight Attacks Returned
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..