रशियात एप्रिलमध्येच आली कोरोनाची लस; पुतीन यांच्यासह अब्जाधीशांनी घेतलीही!

सूरज यादव
Monday, 20 July 2020

रशियाने असाही दावा केला आहे की, त्यांनी कोरोना व्हायरसच्या लशीची चाचणी मानवावर यशस्वीपणे केली आहे. दरम्यान आता एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

मॉस्को - जगभरात कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी संशोधक झटत आहेत. संशोधकांच्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. यामध्ये रशियातील संशोधकांचाही समावेश आहे. रशियाने असाही दावा केला आहे की, त्यांनी कोरोना व्हायरसच्या लशीची चाचणी मानवावर यशस्वीपणे केली आहे. दरम्यान आता एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह दिग्गज राजकीय नेते आणि अब्जाधीशांनी एप्रिल महिन्यात कोरोनाची लस टोचून घेतली होती.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रशियाच्या अब्जाधीशांनी आणि राजकारण्यांनी कोरोना व्हायरसचं वॅक्सिन एप्रिल महिन्यातच टोचून घेतलं होतं. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, पुतीन यांना लस टोचली की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र ज्याप्रकारे वरिष्ठ राजकीय नेत्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांसह अब्जाधीशांना लस दिली आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांना लस दिली नसण्याची शक्यता कमी आहे असाही दावा करण्यात आला आहे. 

रिपोर्टनुसार ज्या अब्जाधीसांना हे वॅक्सिन देण्यात आलं आहे त्यामध्ये अॅल्युमिनिअमची कंपनी युनायटेड रसेलचे वरिष्ठ अधिकारी, अब्जाधीश आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. या वॅक्सिनला मॉस्कोतील रशियाची सरकारी कंपनी गमलेई इन्स्टिट्यूटने एप्रिलमध्ये तयार केलं होतं. गमलेई वॅक्सिनच्या निर्मितीसाठी रशियाचे सैनिक आणि सरकारी रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडाने अर्थसहाय्य केलं आहे. 

हे वाचा - ब्रिटनमध्ये लाखो प्रतिपींड चाचण्या मोफत;20 मिनिटांत निदान, 98.6 टक्के अचूकता

रशियाने अशी माहिती दिली होती की, गेल्या आठवड्यात या लशीची मानवी चाचणी पूर्ण झाली आणि याची टेस्ट रशियाच्या सैन्यातील जवानांवर करण्यात आली होती. लशीच्या चाचणीचे अहवाल अद्याप उघड कऱण्यात आलेले नाहीत. याची परीक्षण आता मोठ्या गटावर केले जात आहे असंही सांगण्यात येत आहे. रशियाच्या गमलेई वॅक्सिनची चाचणी इतर देशांच्या तुलनेत वेगाने होत आहे. तीन ऑगस्टला या वॅक्सिनच्या तिसऱ्या ट्रायलला सुरुवात होणार आहे. यामध्ये रशिया, सौदी अरब, युएईतील हजारो लोकांच सहभाग असणार आहे. सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

गमलेई सेंटरचे हेड अलेक्झांडर जिंट्सबर्ग यांनी सरकारी वृत्तसंस्था TASS ला सांगितलं की, आम्हाला आशा आहे की वॅक्सिन 12 ते 14 ऑगस्टच्या दरम्यान सिव्हिल सर्क्युलेशनमध्ये येईल. खाजगी कंपन्या सप्टेंबरपासून वॅक्सिनच्या निर्मितीला सुरुवात करतील. अजुनही रशियन अधिकाऱ्यांनी पुतीन यांना लस दिली की नाही याबाबत माहिती दिलेली नाही. गमलेईची मानवी चाचणी पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितले.

हे वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचा अखेर पारंपरिक सभांना फाटा

ऑगस्टमध्ये रुग्णांना कोरोना वॅक्सिन दिलं जाईल तो याचा तिसरा टप्पा असेल. कारण ज्यांना डोस मिळेल त्यांचे परीक्षण केलं जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वॅक्सिनच्या सुरक्षेची तपासणी केली जाते. ज्यामुळे तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia s business and political elite access vaccine against Covid-19