रशियाचा हट्टीपणा; संशयास्पद कोरोना लशीचं उत्पादन सुरू करणार 

वृत्तसंस्था
Thursday, 13 August 2020

 रशियानं लसीच्या मानवी चाचणीचा डेटा शेअर केला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. ही बाब गंभीर असून, रशियानं केवळ 38 जणांवर चाचणी करून ही लस लाँच केल्याची माहिती पुढे आली आहे.

मॉस्को : संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनाच्या लशीकडं लागलंय. असं असताना रशियानं अचानक आपल्याकडं सर्व चाचण्यांसह लस तयार असल्याची घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO)जगातील इतर शास्त्रज्ञांनीही या लशीवर संशय व्यक्त केला आहे. परंतु, रशिया आपल्या कोरोना लसीवर ठाम असल्याचं दिसतयं. याबाबत रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराशको यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

रशिया लशीवर ठाम 
रशियानं लसीच्या मानवी चाचणीचा डेटा शेअर केला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. ही बाब गंभीर असून, रशियानं केवळ 38 जणांवर चाचणी करून ही लस लाँच केल्याची माहिती पुढे आली आहे. भारतातून दिल्ली एम्सच्या संचालकांनीही या लशीवर शंका उपस्थित केलीय. परंतु, रशिया या लशीचं उत्पादन करण्यावर ठाम आहे. या संदर्भात रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको म्हणाले, 'येत्या दोन आठवड्यांत रशियात कोरोनाच्या लशीचं उत्पादन सुरू होईल. सुरुवातीला रशियातील उत्पादन क्षमतेचा अंदाज घेतला जाईल. त्यानंतर देशांतर्गत नागरिकांची लशीची गरज लक्षात घेऊन उत्पादन सुरू होईल.' इतर देशांमधून कोरोनाच्या लशीवर संशय घेण्यात येत आहे. त्याविषयी मुराशको म्हणाले, 'सुरुवातीला कोरोना लशीचं पुरेसं उत्पादन करण्यात येईल. त्यानंतरच लस इतर देशांना उपलब्ध करून देण्यात येईल.' रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी कोरोना लस सापडल्याची घोषणा केली होती. पुतीन यांनी ही लस आपण मुलीला दिल्याची माहितीही दिली होती. 

हे वाचा - रशियाची कोरोनावरील लस लाखो लोकांना देणं घातक; वाचा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया

वॅक्सिनचं नाव Sputnik V
रशियाच्या कोरोना वॅक्सिनचं नाव Sputnik V आहे. रशियानं घाईनं कोरोना व्हॅक्सिनची घोषणा केली असली तरी, जगभरातून त्यावर टीका होत आहे. व्हॅक्सिनची रिऍक्शन येण्याची भीती संशोधकांना वाटत आहे. जर, उलटा परिणाम झाला तर, परिस्थिती आणखीनच हाताबाहेर जाईल, असा धोका संशोधकांना वाटत आहे. रशियाच्या व्हॅक्सिनच्या अहवालानुसार, रशियन अधिकाऱ्यांनी फक्त 42 दिवस संशोधनानंतर कोरोना लशीला मंजुरी दिल्याचं बोललं जातंय. या लशीच्या मानवी चाचमीवरच शंका उपस्थित करण्यात आलीय. रशियाच्या लशीचा कितपत प्रभाव आहे याबाबत कोणताही अभ्यास झालेला नाही. रशिया मात्र या लशीच्या संशोधनावर ठाम आहे.

हे वाचा - सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia to start covid19 vaccine production within two weeks