२०३६पर्यंत पुतीन सत्तेत राहणार; संविधानात केला फेरबदल

Russia_Putin
Russia_Putin

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा पुढील १५ वर्षे सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी (ता.५) त्यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये त्यांना सन २०३६ पर्यंत सत्तेत राहण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

पुतीन यांचा चौथा कार्यकाळ
मॉस्को टाईम्सच्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्षपदी पुतीन यांचा हा सलग दुसरा आणि एकूण चौथा कार्यकाळ आहे. राज्यघटनेनुसार त्यांना २०२४ मध्ये सत्ता सोडावी लागणार होती, पण आता घटना दुरुस्तीमुळे पुढील १५ वर्षे ते आपल्या पदावर कायम राहू शकतात. पुतीन यांनी गेल्या वर्षी देशातील नागरिकांकडून मतपत्रिका मागविल्या होत्या. त्यामध्ये त्यांना ६ वर्षांच्या आणखी दोन कार्यकाळ सत्तेमध्ये राहण्याची मुभा देण्याबाबत नागरिकांनी मते दिली होती. याला रशियातून मोठा विरोध करण्यात आला होता. तरीही त्यांनी मोठ्या विजयाचा दावा केला होता. त्यानंतर या प्रस्तावाला रशियन संसदेनेही मान्यता दिली.

पुतीन मोडणार स्टॅलिनचा विक्रम?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, २०२४नंतर रशियन राष्ट्राध्यक्षांसाठी ६-६ वर्षांची मुदत असेल. पुतीन यांनी दोन्ही वेळा विजय मिळविला, तर ते २०३६पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहतील. जर असे झाले, तर जोसेफ स्टॅलिन आणि पीटर यांचा प्रदीर्घ काळ सत्तेत राहण्याचा रेकॉर्ड पुतीन मोडतील. सोमवारी मंजूर झालेल्या विधेयकात पुतीन यांना पुढील २० वर्षे निवडणूक लढविण्याचा आणि सत्तेत राहण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.

विरोधकांची टीका
माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनाही या विधेयकाद्वारे आणखी दोन निवडणुका लढवण्याची मुभा देण्यात आली आहे. २००८ ते २०१२ या काळात मेदवेदेव यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले होते. 

या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुतीन यांच्यावर टीका केली आहे. आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचा हुकूमशहा राहण्यासाठी पुतीन यांनी हे विधेयक मंजूर करून घेतलं, असं विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधी पक्षनेते अॅलेक्स नवाल्नी यांच्यावरील विषप्रयोगाबाबतही तसेच विरोधी पक्षातील नेत्यांवर पुतीन अत्याचार करत असल्याचे आरोप केले जात आहेत. 

या विधेयकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पुतीन यांनी २०२४ पर्यंतचा कार्यकाळ पुरेसा असल्याबाबत म्हटले होते. २०२४नंतर निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही ते म्हणाले होते. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com