चिडलेल्या युट्यूबरने अडीच कोटींची मर्सिडीज दिली पेटवून; VIDEO VIRAL

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त केली जाते. स्वस्त असेल तर लोक नवीसुद्धा घेतात. पण एका युट्यूबरने कोट्यवधी रुपयांच्या मर्सिडीजमध्ये प्रॉब्लेम आला म्हणून चक्क पेटवली आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला.

मॉस्को - एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त केली जाते. स्वस्त असेल तर लोक नवीसुद्धा घेतात. पण एका युट्यूबरने कोट्यवधी रुपयांच्या मर्सिडीजमध्ये प्रॉब्लेम आला म्हणून चक्क पेटवली आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला. असं सांगितलं जात आहे की, रशियन ब्लॉगर मिखाइल लिट्विन त्याच्या कारमध्ये सातत्याने येणाऱ्या प्रॉब्लेममुळे त्रासला होता. अखेर कंटाळून त्याने अलिशान कार मोकळ्या मैदानात आणली आणि ती पेटवून दिली. 

युट्यूबरने पेटवलेली मर्सिडीज जवळपास अडीच कोटी रुपयांची होती. युट्यूबवर कार जाळल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. कार खरेदी केल्यानंतर काही दिवसांच्या आतच त्यामध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. 

गाडी सातत्याने खराब व्हायला लागल्याने युट्यूबरने ती मर्सिडीज डीलरकडे पाचवेळा परत पाठवली. मात्र प्रत्येकवेळी डीलरकडून योग्य उत्तर मिलालं नाही. तसंच कार दुरुस्त होण्यासाठी 40 दिवस लागल्याचा दावाही करण्यात आला आहे. स्थानिक वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर्मनीमधून नवीन टर्बाइन मागवण्यात आलं. ते बदलल्यानंतरही कार वारंवार नादुरुस्त होत होती. 

शेवटी शेवटी डिलर्सनी कॉल उचलणंही बंद केलं. शेवटी त्याने निषेध व्यक्त करत कार पेटवून देण्याचा निर्णय घेतला. चार दिवसापूर्वी त्याच्या युट्यूब चॅनेलवरील एक व्हिडिओ समोर आला त्यात मर्सिडीज पेटवून देताना दिसत आहे. रिकाम्या मैदानात कार नेल्यानंतर त्यावर पेट्रोल ओतलं आणि लायटरने  आग लावली. व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, मर्सिडीजकडून काही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा मी बऱ्याच काळापासून विचार करत होतो की गाडीचं काय करावं. शेवटी आग लावण्याचा निर्णय घेतला. 

हे वाचा - नवजात बाळाचा मृतदेह सापडल्याने महिलांना विमानातून उतरवून केली तपासणी

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका युजरन तुम्ही असं कसं करू शकता असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका ब्लॉगरने म्हटलं की, अमेरिकन आयफोन तोडतात तर रशियन मर्सिडीज पेटवून देतात. युट्यूबरने कार जाळल्याचा व्हिडिओ अपलोड केला आता त्यावर जाहिरातीतून तो आणखी दोन मर्सिडीज खरेदी करेल अशीही प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russian blogger burns his-mercedes-after-facing-issues-video viral