रशियाने जगातील सर्वात शक्तीशाली स्फोटाचा VIDEO केला प्रसारित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

जपानमधील हिरोशिमा शहरावर १९४५ मध्ये टाकलेल्या अणुबाँबपेक्षा रशियाच्या हा हायड्रोजन बाँब तीन हजार ३३३ पटीने अधिक विध्वंसक असल्याचे सांगितले जाते. 

मॉस्को - रशियाने ५९ वर्षांपूर्वी केलेल्या जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन बाँबच्या स्फोटाच्या चाचणीची व्हिडिओ चित्रफीत रशियाच्या ‘रोसस्तोम’ या अणुऊर्जा संस्थेने नुकतीच प्रसारित केली आहे. याला ‘झार बाँबा’ किंवा ‘झार बाँब’ असे म्हटले जाते. या बाँबची चाचणी प्रथम ३० ऑक्टोबर १९६१मध्ये घेण्यात आली. जपानमधील हिरोशिमा शहरावर १९४५ मध्ये टाकलेल्या अणुबाँबपेक्षा रशियाच्या हा हायड्रोजन बाँब तीन हजार ३३३ पटीने अधिक विध्वंसक असल्याचे सांगितले जाते. 

‘टीएनटी’च्या स्फोटाशी तुलना 
‘न्यूयॉर्क टाईम्स’मधील वृत्तानुसार आर्टिक सागरातील नोव्हाया झेमलिया या द्विपसमूहात या बाँबची पहिली चाचणी झाली. या स्फोटाचे चित्रीकरण आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. ‘टॉप सिक्रेट ः टेस्ट ऑफ ए क्लिन हायड्रोजन बाँब विथदिन ए यिल्ड ऑफ मेगाटोन्स’ या शीर्षकाच्या या चित्रीकरणात बाँब कसा तयार केला जातो आणि चाचणीस्तरावर त्याचास्फोट करण्यापूर्वी तो चाचणीच्यास्थळी कसा आणला जातो, हे यात दाखविले आहे. या बाँबच्या स्फोटाची तुलना पाच कोटी टन ‘टीएनटी’च्या स्फोटाशी केली जाते. 

प्रखर प्रकाश व धुरांचे ढग 
या ऐतिहासिक चाचणीच्या स्फोटाची दृश्‍य पुरावे मर्यादित होते. काही कमी दर्जाची छायाचित्रे आणि धुसर चित्रफीत उपलब्ध होती. ‘रोस्तोम स्टेट एनर्जी कॉर्पोरेशन’ने यासंबंधीची चित्रफीत २० ऑगस्टला पहिल्यांदाच प्रसारित केली. यात सर्व तपशीलांसह स्फोटाचे चित्रीकरण आहे. हा बाँब ‘सोव्हिएट टीयू-९५’ या बाँबवाहकातून चाचणीच्या स्थळी आणण्यात आला होता. पॅराशूटला जोडलेला झार बाँब हा विमानातून सोडल्यानंतर उलट गणिती सुरू झाली होती. समुद्रसपाटीपासून चार हजार मीटर उंचीवरील नियोजित स्थळी तो पोचल्यावर त्याचा प्रखर प्रकाशासह त्याचा स्फोट झाला. यानंतर धुराच्या ढगांचे मोठे लोट उठले होते. हा बाँब एवढा शक्तिशाली आहे की युद्धात वापरण्यासाठी तो अत्यंत घातक असल्याचे सांगितले जात असे. 

हे वाचा - ख्राइस्टचर्च हल्लेखोराला मरेपर्यंत तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही अशी शिक्षा

लांबी  - २६ फूट 
वजन - २७ टनापेक्षा जास्त 
शक्तिशाली - ३,००० पटीने अधिक 

बाँब तयार करण्यामागे... 
- अण्वस्त्र क्षेत्रातील अमेरिका व रशियातील स्पर्धेतून बाँबची निर्मिती. 
- अमेरिकेने पहिला अणुबाँब तयार करून१९४५मध्ये त्याची चाचणी घेतली. 
- मात्र तत्कालीन सोव्हिएट महासंघाने जगातील सर्वांत विनाशक बाँब तयार केला. 
- अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या ‘लिटिल बॉय’आणि ‘फॅट मॅन’ या अणुबाँबप्रमाणे स्वरूप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russian release largest ever hydrogen bomb blast video