Salman Rushdie : रश्‍दी यांचा डोळा व हात निकामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Rushdie

Salman Rushdie : रश्‍दी यांचा डोळा व हात निकामी

न्यूयॉर्क : साहित्यविषयक कार्यक्रमात झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले प्रसिद्ध लेखक सलमान रश्‍दी यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली असून एक हाथही निकामी झाला आहे. ही माहिती त्यांचे सहाय्यक अँड्रयू वायली यांनी दिली.

न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला आयोजित कार्यक्रमात रश्‍दी भाषणासाठी व्यासपीठावर आले असता हदी मतार (वय २४) या युवकाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. गळा आणि पोटावर चाकूचे वार झाल्याने रश्‍दी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने पेनसिल्व्हेनियातील रुग्णालयात दाखल केले होते. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार रश्‍दी यांचे फुफ्फुस, डोळे आणि एका हाताच्या नसेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्लेखोर मतार हा मूळचा लेबनॉनचा असून न्यूजर्सीला राहतो. त्याला अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयासमोर त्याला हजर केले असता, त्याने निर्दोष असल्याचा दावा कला होता.

एका स्पॅनिश वृत्तपत्राला मुलाखत देताना वायली म्‍हणाले की, रश्‍दी यांच्यावरील हल्ला अत्यंत क्रूर होता. त्यांच्या गळ्यावर तीन खोल वार करण्यात आले होते. यामुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. त्यांच्या हाताची नसही कापली गेल्याने हात निकामी झाला आहे. त्यांच्या छातीवर व संपूर्ण शरीरावर सुमारे १५ घाव होते. रश्‍दी आता कोणत्या रुग्णालयात आहेत आणि त्यांची तब्येत आता कशी आहे, हे वायली यांनी स्पष्ट केले नाही. त्यांचा जीव वाचणार आहे, ही जास्त महत्त्वाची बाब आहे, असे ते म्हणाले.

हल्ल्याचा धोका कायम होता’

भारतात जन्मलेल्या सलमान रश्‍दी यांचे चौथे पुस्तक ‘सॅटेनिक व्हर्सेस’ (१९८८) प्रसिद्ध झाल्यानंतर ते वादग्रस्त ठरले होते. त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या होत्या. इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते रुहोल्ला खोमेनी यांनी त्यांना मारण्यासाठी फतवा काढलेला होता. त्याचा संदर्भ घेत फतवा निघाल्यानंतर रश्दींवर एवढ्या वर्षांनी हल्ला झाला याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोकादायक असलेल्या काळात आपण जगत आहोत, असे म्हणता येईल का, असा प्रश्न वायली यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, फतवा लादल्यानंतर अनेक वर्षांनीही रश्‍दींवर कोणाकडूनही हल्ला होण्याचा धोका असल्याची चर्चा रश्‍दी व माझ्यात झाली होती. तशाच प्रकारचा हा हल्ला होता, असे मला वाटते.

टॅग्स :attackglobal news