सौदीतील ड्रोनहल्ल्याने पेट्रोल पेटण्याची चिन्हे

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

इराणकडून युद्धाची धमकी
सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावर झालेल्या ड्रोनहल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले आहे. इराणने आज थेट अमेरिकेलाच युद्धाची धमकी दिली आहे. अमेरिकेची लष्करी तळे आणि त्यांच्या विमानवाहू नौका आमच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मौसावी यांनी सांगितले.

एकूण तेल उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी घटले; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागण्याची शक्यता
रियाध - सौदी अरेबियातील सर्वांत मोठ्या ‘आरमको’ कंपनीच्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर येमेनी बंडखोरांनी ड्रोनहल्ले केल्यानंतर सौदीने या भागातील तेलाचे उत्पादन थांबविले आहे. 

या हल्ल्यामुळे सौदीतील तेल उत्पादन पन्नास टक्‍क्‍यांनी घटल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. सौदीतील या हल्ल्यामुळे भारताच्या चिंताही वाढल्या असून, खुद्द परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि तेल कंपन्या तेथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ताज्या हल्ल्यानंतर देशांतर्गत इंधनाच्या किमती भडकण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. भारतही सौदीकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा कच्च्या तेलाच्या किमतींनी शंभर डॉलरचा टप्पा ओलांडल्यास भारतीय कंपन्यांचा ताळेबंद बिघडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर ‘अबाकिक’ आणि ‘खुराईस’ या दोन्ही तेल उत्पादक क्षेत्रांतील उत्पादन तात्पुरते थांबविण्यात आल्याचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुल्लाझीझ बिन सलमान यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्या दोन तेल उत्पादक क्षेत्रांवर हे हल्ल करण्यात आले, तेथून रोज ५.७ दशलक्ष बॅरल एवढ्या कच्च्या तेलाचे उत्पादन होत असे. या हल्ल्यामुळे झालेले नुकसान लवकरच भरून काढण्यात येईल, यासंदर्भातील सुधारित माहितीही आम्ही दोन दिवसांनी जाहीर करू, असे ‘आरमको’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर यांनी सांगितले.

इराणकडून निषेध
अमेरिकेने सौदी अरेबियातील या ड्रोनहल्ल्यांसाठी इराणशी संबंधित हुथी बंडखोरांना जबाबदार ठरविले असून, या दहशतवाद्यांना इराणकडूनच शस्त्रपुरवठा केला जात असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाम्पिओ यांनी केला आहे. इराणने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. या अनुषंगाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीच्या राजांशी संवाद साधला, तसेच या भ्याड हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेधही केला आहे.

हा हल्ला वेगळा
सौदीचे राजे मोहंमद बिन सलमान यांनीही आक्रमक भूमिका घेत दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. सौदीने इराणच्या तेलक्षेत्रावर हल्ला केला, तर हा संघर्ष आणखी चिघळू शकतो, अशी भीती अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. याआधीही हुथी बंडखोरांनी सौदीच्या तेल उत्पादक क्षेत्रांना लक्ष्य केले होते. पण, हा हल्ला मात्र वेगळा असल्याचे बोलले जाते.

गोपनीयता कायम
या हल्ल्यात तेल प्रकल्पाचे नेमके किती नुकसान झाले, कोणत्या शस्त्राचा यासाठी वापर करण्यात आला होता, याबाबतची माहिती सौदीने पत्रकारांना दिलेली नाही. ‘आरमको’ ही सौदीतील सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी असून, या कंपनीने तेलाच्या साठवणुकीसाठी जमिनीखाली वेगळी व्यवस्था केली आहे. ही तेल साठवणुकीची केंद्रे सुरक्षित राहावी म्हणून सौदीने हजारो कोटी डॉलर खर्च केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saudi arabia Drone Attack Petrol