कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या शहरातील शाळा अनलॉक होणार

टीम ई-सकाळ
Saturday, 29 August 2020

वुहान मधील शैक्षणिक संस्था पुढील आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोना विषाणूचा सगळ्यात आधी केंद्र बिंदू चीन मधील वुहान शहर ठरले होते. चीनच्या वुहान या शहरात मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. व यानंतर संपूर्ण वुहान शहरात या विषाणूचा उद्रेक झाला होता. आणि चीननंतर बघता बघता या विषाणूने संपूर्ण जगभरात आपले पाय पसरण्यास सुरवात केली. याशिवाय नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोनाने युरोपीय देशांमध्ये हाहाकार माजवला. मात्र कोरोनाच्या विषाणूवर कोणताच इलाज नसल्यामुळे बहुतेककरून सर्वच देशांनी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला. व या लॉकडाउनचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याने लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत, सामान्य जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सगळीकडे सुरु झाला आहे. परंतु अधिकतर देशांमध्ये शाळा, महाविद्यालये अजूनतरी बंदच ठेवण्यात आली आहेत. तर वुहान मधील शैक्षणिक संस्था मात्र पुढील आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोना विषाणूला पायबंद घातल्यानंतर येत्या सोमवार पासून चीनच्या वुहान प्रांतातील 2,842 शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु होणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने काल शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे या संस्थांमध्ये शिकत असलेल्या 1.4 दशलक्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा व विद्यालयांची दारे पुन्हा उघडली जाणार आहेत. तर वुहान विद्यापीठ सोमवार पासून उघडले जाणार आहे. यावेळेस स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी काही सूचना जाहीर केलेल्या असून, यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयाच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक टाळण्याचा सल्ला देखील प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. 

आता दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्यावरून अमेरिका व चीन आमनेसामने

याव्यतिरिक्त, शाळांना रोग नियंत्रणाच्या साधनांचा साठा करण्याचे आणि नवीन प्रादुर्भावाची तयारी करण्यासाठी कवायती व प्रशिक्षण सत्रे चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व अनावश्यक सामूहिक मेळावे देखील प्रतिबंधित केले असून, दररोज आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल सादर कारण्यासंदर्भात शैक्षणिक संस्थांना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी कोरोनाच्या प्रभावामुळे वुहान शहर जानेवारी मध्ये संपूर्णपणे बंदिस्त करण्यात आले होते. त्यानंतर 18 मे पासून कोरोनाची कोणतीही नवीन प्रकरणे येथे सापडलेली नाहीत. 

दरम्यान, चीनमध्ये आत्तापर्यंत 89 हजार 836 नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर 4 हजार 718 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला असून, अमेरिकेत 59 लाख 18 हजार 381 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आणि 1 लाख 81 हजार 779 जणांचा जीव गेला आहे. यानंतर कोरोनाने संक्रमित देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझील मध्ये 38 लाख 04 हजार 803 कोरोना संक्रमित रुग्ण सापडले असून, 1 लाख 19 हजार 504 जणांचा जीव कोरोनामुळे गेला आहे. आणि त्याच्यानंतर भारत या यादीत तिसऱ्या नंबरवर पोहचला आहे. भारतात सध्या 34 लाख 63 हजार 972 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. व दिवसेंदिवस यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरच पडत आहे. आणि भारतात 62 हजार 550 जणांचा कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण जगभरात आत्तापर्यंत 2,47,72,926 नागरिकांना  कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. आणि 8 लाख 37 हजार 879 जणांचा मृत्यू झालेला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in the city where the corona virus originated will be unlocked