कोरोना आला कुठून? कुणाच्याही संपर्कात न येता 5 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 13 November 2020

सीड्रिम SeaDream क्रुझ शीप 53 प्रवासी आणि 66 क्रु मेंबरना घेऊन जात होते

वॉशिंग्टन- कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे समुद्री प्रवास थांबवण्यात आला होता. महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर सुरु करण्यात आलेल्या एका क्रुझ शीपमधील पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आढळले आहे. हे क्रुझ शीप कॅरेबियन समुद्रातून जात होते. यावेळी एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे क्रुझ शीपला बारबाडोस येथे परत आणणे भाग पडले. विशेष म्हणजे प्रवासाच्या सुरुवातीला सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर क्रुझ शीपचे सॅनिटायझेशन करण्यात आले होते. सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सुद्धा शीपमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

सीड्रिम SeaDream क्रुझ शीप 53 प्रवासी आणि 66 क्रु मेंबरना घेऊन जात होते. प्रामुख्याने प्रवासी अमेरिकेमधून बसले होते. प्रवाशादरम्यान एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. बारबोडस येथे शीप आणल्यानंतर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील कमीतकमी 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढलल्याचे सांगण्यात आले आहे.

VIDEO: पाकच्या कुरापतीला भारताचे जोरदार प्रत्युत्तर; 8 सैनिकांचा खात्मा

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावानंतर सीड्रिमने वेस्ट इंडिजचा प्रवास पहिल्यांदाच सुरु केला होता. सीड्रिम क्रुझ शीप नॉर्वेमधील Yacht Club च्या मालकीची आहे. कंपनीने मोठा गाजावाजा करत प्रवाशांना कोरोनापासून पूर्ण बचावाची खात्री दिली होती. पण, तरीही क्रुझवरील प्रवाशांना कोरोनाने गाठले. सध्या शीपला बंदरात उभे करण्यात आले असून सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी घेतल्यानंतरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. आम्ही योग्य खबरदारी घेतली, पण तरीही शीपमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असं प्रवासी ब्रायट म्हणाल्या आहेत. 

शीपच्या क्रु मेंबरची चाचणी करण्यात आली असून सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. प्रवाशांची पुन्हा एकदा चाचणी केली जाणार असून प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असल्याचे सीड्रिम प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. शीपवरील प्रवाशी आणि क्रु मेंबर यांची सुरक्षा आणि आरोग्य आमची प्राथमिकता आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, कोरोनाचा हाहाकार सुरु असताना पुन्हा एकदा समुद्री प्रवास काही प्रमाणात पुन्हा सुरु करण्यात आला आहे. पण, युरोपमध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली आहे. दुसरीकडे अमेरिकेमध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सीड्रिममध्ये प्रवास करणारे अधिकतर प्रवासी अमेरिकेतील होते. त्यामुळे अमेरिकीत क्रुझ ऑपरेशन या वर्षाच्या शेवटापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SeaDream five passengers test positive for Covid on Caribbean cruise ship