Sealand | निवृत्तीनंतर त्याने चक्क एक देशच स्थापन केला; दोन खांबांवरचा छोटा देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sealand

Sealand : निवृत्तीनंतर त्याने चक्क एक देशच स्थापन केला; दोन खांबांवरचा छोटा देश

मुंबई : कार्यालयीन कामातून निवृत्ती मिळवल्यानंतर आपण काय करतो ? नातवंडांसोबत खेळतो, सामाजिक कार्य करतो, फिरायला जातो आणि आराम करतो. पण ब्रिटीश फौजेतला एक मेजर निवृत्त झाला आणि त्याने चक्क एक अख्खा देशच स्थापन केला.

हा जगातील सर्वांत लहान देश केवळ दोन खांबांवर वसलेला आहे; पण तरीही त्यांच्याकडे त्यांचा झेंडा आहे, राष्ट्रगीत आहे आणि फुटबॉलची टीमसुद्धा.

सीलँड हे चिमुकलं संस्थान इंग्लंडच्या सफॉक किनाऱ्याजवळ आहे. हा जगातला सर्वात लहान देश आहे असं म्हटलं जातं. खरंतर हा दुसऱ्या महायुद्धात अँटीएअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होता. १९४२मध्ये तो तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं एचएम फोर्ट रफ्स.

हा किल्ला ब्रिटनच्या सीमेबाहेर होता. शस्त्रांनी सज्जही होता. युद्धकाळात इथं रॉयल नेव्हीचे ३०० सैनिक तैनात होते. १९५६मध्ये इथून नौदल पूर्णपणे हटवलं आणि हा किल्ला बेवारशासारखा एकाकी झाला.

१९६६पर्यंत हा किल्ला निर्जनच होता. मग एकेदिवशी ब्रिटिश फौजेतला एक निवृत्त मेजर इथे आला आणि त्याने नव्या देशाची स्थापना केली. हा किल्ला किनाऱ्यापासून १२ किमी दूर आहे आणि नावेतून पाहाता येतो. दिसायला आजिबात खास वाटत नाही. दोन खांबांवर एखाद्या कंटेनरसारख्या इमारतीचं बांधकाम आहे.

नावेतून तिथे जाणाऱ्या व्यक्तीला क्रेनने वर ओढावं लागतं. त्याशिवाय वर जाण्याचा दुसरा रस्ताच नाही. 'इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरचा क्युबा' असा या देशाचा उल्लेख ब्रिटीश कागदपत्रांमध्ये आहे.

युद्धाच्या काळात ब्रिटनने हा प्लॅटफॉर्म आपल्या सामुद्रसीमेबाहेर अवैधरित्या बांधला होता. पण तेव्हा युद्धाच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नव्हता. खरंतर तेव्हाच हे नष्ट करण्याची संधी ब्रिटिशांकडे होती पण त्यांनी तिकडं ढुंकूनही पाहिलं नाही. अनेक दशकं सीलँड तिथंच उभा आहे.

सीलँडचं क्षेत्रफळ फक्त ०.००४ चौ. किमी आहे. 'मायक्रोनेशन : द लोनली प्लॅनेट गाईड टू होम-मेड नेशन्स' या पुस्तकाचे सहलेखक जॉर्ड डनफोर्ड म्हणतात, अशा कृतीसाठी वर्तमान सरकारविरुद्धचा असंतोष आणि आपल्या पद्धतीनं काम करण्याची असणारी इच्छा कारणीभूत असते.

डनफोर्ड म्हणतात, सीलँड हे एक विशेष प्रकरण आहे. कारण दीर्घकाळापासून ते सुरू आहे आणि कायद्याच्या कचाट्यातून नेहमी सुटलेलं प्रकरण आहे.

अमेरिकेत अशा कुटुंबाला एक असंतुष्ट कुटंब म्हणून पाहिलं गेलं असतं. पण १९६०च्या दशकात ब्रिटन अधिक उदार होतं तेव्हा हे प्रकरण सोडवण्यात काही फायदा नाही असं अधिकाऱ्यांना वाटलं असेल. एकदोनदा प्रयत्न करुन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला पण त्यातून सीलँड सुटलं.

मान्यतेचे नियम

कोणत्याही देशाने या देशाला मान्यता दिलेली नाही. पण या देशाला त्याची पर्वा नाही. लहान देशांना मान्यता देण्याचे नियम १९३३ साली मॉंटेव्हीडिओ संमेलनात तयार करण्यात आले होते. त्यात अशा राज्यांचे अधिकार आणि कर्तव्यं निश्चित केली होती.

अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्टसह आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याच संमेलनात राज्यासाठी चार मापदंड ठरवण्यात आले होते.

लहान देशांना या मापदंडाच्या आधारावरच मान्यता मिळते असं डनफोर्ड सांगतात. देश म्हणवलं जाण्यासाठी लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, सरकार आणि इतर देशांशी संबंध यांचा विचार केला जातो.

चौथा आणि शेवटचा मापदंड लहान देशांना जास्त जेरीस आणतो कारण ते सतत आपल्याला मान्यता द्या यासाठी इतर देशांकडे भूणभूण लावत असतात. सीलँड मात्र असं करत नाही. ते स्वतःला सार्वभौम समजतात आणि त्यावर आपलाच हक्क असल्याचं समजतात.

प्रत्येक देशाच्या उत्पत्तीची, जन्माची एक कहाणी असते. सीलँडची कहाणी १९६५पासून सुरू होते. पॅडी रॉय बेट्स ब्रिटिश सैन्यात मेजरपदावरुन निवृत्त झालेले होते. त्यानंतर त्यांनी मासेमारी सुरू केली होती. त्यांनी रेडियो इसेक्सची स्थापना केली होती.

एचएम फोर्ट रफ्स जवळ एक नॉक जॉन नावाचा किल्ला होता. त्याचा वापरही बंद करण्यात आला होता. त्या किल्ल्यात पॅडी यांनी एक पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं.

त्यावेळेस अवैध रेडियो स्टेशन्सची लोकप्रियता इतकी वाढली की ब्रिटिश सरकारला १९६७ साली सागरी प्रसारण अपराध कायदा तयार करावा लागला. अशा प्रकारची स्टेशन्स बंद पाडणे हा एकमेव उद्देश होता. त्यामुळे संधी पाहून बेट्स यांनी आपलं स्टेशन रफ्सवर नेलं. ही जागा ब्रिटीश सागरी सीमेपासून दूर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होती.

नॉक जॉनप्रमाणे हा सुद्धा निर्जन सागरी किल्ला होता आणि त्याची अवस्था वाईट होती. १९६६च्या ख्रिसमसच्या आधी त्यांनी हे ठाणं ताब्यात घेतलं. नऊ महिन्यांनी २ सप्टेंबर १९६७मध्ये त्यांनी सीलँडची घोषणा केली. त्याच दिवशी त्यांची पत्नी जोन हिचा वाढदिवस होता. काही दिवसांनी सगळं कुटुंब तिथं राहू लागलं.

paddy roy bates

paddy roy bates

झेंडा, राष्ट्रगीत आणि फुटबॉलची टीम

१९७०च्या दशकात इथं ५० लोक राहात असत. त्यामध्ये सर्व डागडुजी करणारे, स्वच्छता करणाऱ्यांचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी होते. ब्रिटनच्या सरकारविरोधातील आंदोलनाचं ते प्रतिक बनलं होतं.

सीलँडच्या काही समस्याही होत्या. पॅडी यांची पुत्र मायकल म्हणतात, काहीच उपयोगाला यायचं नाही. आमची सुरुवात मेणबत्त्यांपासून झाली होती. मग हरिकेन लुप आणि जनरेटर आले. सीलँडनं आपलं राष्ट्रीयत्व तयार केलं. शासकीय चिन्हं तयार केली. घटना लिहिली. त्यांचा स्वतःचा झेंडा आहे. फुटबॉलची टीम आणि राष्ट्रगीतही आहे.

सीलँडच्या चलनावर युवराज्ञी जोन यांचं चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी ५०० पासपोर्ट दिलेत. स्वातंत्र्यावर प्रेम हे त्यांचं बोधवाक्य आहे. मायकल त्यांची तीन मुलं (जेम्स, लियाम आणि शार्लोट) आणि दुसरी पत्नी (मेई शी, या चीनच्या पिपल्स रिबरेशन आर्मीमधल्या निवृत्त मेजर आहेत) सीलँडचा राजवंश चालू ठेवत आहेत.

टीशर्ट आणि तिकीट विक्रीवर अवलंबून अर्थव्यवस्था

सीलँडसंदर्भात सर्वात वादग्रस्त घटना १९७८मधली आहे. त्यावर ताबा मिळवण्यासाठी जर्मनी आणि हॉलंडचे लोक आले होते. मात्र बंदूक रोखून बेट्स परिवाराने त्या सर्वांना ताब्यात घेतलं. त्यांना सोडवण्यासाठी लंडनमधून जर्मनीचे राजदूत व शिष्टमंडळ हेलिकॉप्टरने आलं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला मान्यता दिली.

स्वातंत्र्य सहज मिळत नाही. सीलँडच्या डागडुजीचा खर्च आहे. पहारेकरी तेथेच राहातात. हा खर्च भरुन काढण्यासाठी सीलँडवासी ऑनलाइन स्टोअरवर टीशर्ट, पोस्टाची तिकीटे, राजकीय पदव्या विकतात. लॉर्ड, लेडी. बॅरोन, बॅरोनेस या पदव्या २९.९९ पौंडात विकत घेता येतात.

इथं सीमा शुल्क आणि इमिग्रेशनचे सामान्य कायदे लागू नाहीत. राजकुमारांचं अधिकृत आमंत्रण मिळाल्याशिवाय सीलँडवर जाता येत नाही. ते स्वतः तिथं वर्षातून फक्त दोन ते तीन वेळा जातात. बाकी कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही तिथं राहात नाही.

सीलँडला नागरिकत्व मिळवण्यासाठी दररोज १०० ईमेल्स येतात. दिल्लीपासून टोकियोपर्यंतचे लोक सीलँडशी प्रामाणिक राहाण्याची शपथ घ्यायला तयार आहेत.