
चंद्राच्या मातीत बिजाला फुटले अंकुर
वॉशिंग्टन : चंद्रावर मानवी वसाहती उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संशोधकांनी भविष्यामध्ये तिथे शेती करायला सुरूवात केली तर आश्चर्य वाटायला नको. ‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत पृथ्वीवर आणण्यात आलेल्या चंद्रावरील मातीमध्ये संशोधकांनी प्रथमच यशस्वीरित्या वृक्षारोपण केले आहे त्यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमेदरम्यान अंतराळविरांना अवकाशामध्येच अन्न आणि ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल.
अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी चंद्रावरून आणण्यात आलेल्या मातीमध्येही रोपटे वाढू शकते, हे सप्रमाण सिद्ध केले आहे. हे संशोधन ‘जर्नल कम्युनिकेशन्स बॉयॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. चंद्राच्या मातीला रोपटे कशा पद्धतीने प्रतिसाद देते हे देखील संशोधकांनी पडताळून पाहिले आहे. चंद्र आणि पृथ्वीवरील मातीमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो, चंद्रावरील मातीमध्ये बारीक खडकाचाही समावेश असतो असे असतानाही त्यामध्ये बिजाला अंकुर फुटू शकतात हे सिद्ध झाले आहे. अंतराळामध्ये वनस्पतीची कशा पद्धतीने वाढ होती? हे पडताळून पाहण्यासाठी ‘नासा’च्या संशोधकांनी ‘आर्टिमीस प्रोग्रॅम’ची आखणी केली आहे असे ‘यूएफ इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर सायन्सेस’मधील संशोधक रॉब फेर्ल यांनी सांगितले.
दीर्घपल्ल्याच्या मोहिमेदरम्यान फायदा
भविष्यात दीर्घपल्ल्याच्या अंतराळ मोहिमांसाठी आपण चंद्राचा लॉचिंग पॅडप्रमाणे वापर करू शकतो. तेथील मातीमध्ये आपल्याच वनस्पतींची लागवड करता येईल. या वृक्षारोपणाचा प्रयोग देखील खूप सोपा आहे. तुम्ही सुरूवातीला चंद्रावरील मातीमध्ये बी पेरू शकता त्यानंतर त्याला केवळ पाणी, खते आणि प्रकाश मिळाला की आपोआप वनस्पतीची वाढ होऊ लागते. आताही ज्या मातीमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता ती केवळ चमचाभर होती. ‘अपोलो’ ११, १२ आणि १७ या मोहिमांदरम्यान या मातीचे नमुने गोळा करण्यात आले होते. आता त्यामध्येच हा प्रयोग करण्यात आला आहे.
Web Title: Seedlings Sprouted In Soil Of The Moon Research By Scientists University Of Florida Usa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..