आफ्रिदीने मानले युवराज, हरभजनचे आभार, कारण...

वृत्तसंस्था
Wednesday, 1 April 2020

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अशात गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी शाहिद आफ्रिदी सरसावला आहे.

नवी दिल्ली : कठीण काळात जात, धर्म, सीमा अशी कोणतीच बंधने मनुष्याला मदतीपासून रोखू शकत नाहीत. असेच काही भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्येही पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग ग्रासले असताना पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्या समाजकार्याला भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंग व युवराजसिंग यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आफ्रिदीनेही या दोघांचे आभार मानले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अशात गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी शाहिद आफ्रिदी सरसावला आहे. त्याच्या या समाजकार्याला भारताचे क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. हरभजन व युवराज यांनी आफ्रिदीच्या या समाजकार्यात लोकांना हातभार लावण्याचे आवाहन केले आहे. 

शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनने आतापर्यंत पाकिस्तानातील दोनशेहून अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम केले आहे. युवराजने ट्विट करत म्हटले आहे, की हा कसोटीचा काळ आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग योगदान करूया.... मी शाहिद आफ्रिदी आणि त्याच्या फाऊंडेशनच्या समाजकार्याला सपोर्ट करतो. तुम्हीही त्याच्या समाजकार्यात मदत करा.

शाहिद आफ्रिदी आणि त्याचं फाऊंडेशन चांगलं काम करत आहेत. त्याच्या कार्यात आपणही हातभार लावूया आणि जमेल तशी मदत करूया, असे हरभजनने म्हटले आहे. या दोघांचे आभार मानताना आफ्रिदी म्हणाला, की तुमच्या सहकार्याबद्दल दोघांचेही आभार... तुमच्या या प्रेमानं शांततेचा संदेश दोन्ही देशांना दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Afridi thanks Yuvraj Harbhajan Singh for supporting his foundation