आतापर्यंतचा विक्रम मोडला; अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा

कार्तिक पुजारी
Monday, 13 July 2020

कोरोना महामारीने सर्वाधिक त्रस्त असणाऱ्या अमेरिकेत रविवारी चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. जॉन होपकिंस यूनिवर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनाचे तब्बल 66 हजार 528 रुग्ण आढळून आहे

वॉशिंग्टन- कोरोना महामारीने सर्वाधिक त्रस्त असणाऱ्या अमेरिकेत रविवारी चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. जॉन होपकिंस यूनिवर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनाचे तब्बल 66 हजार 528 रुग्ण आढळून आहे. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. यासोबत अमेरिकेतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 लाख 42 हजार 73 वर पोहचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 34 हजार 729 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून अमेरिकेत दररोज 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. 
 
अखेर नेपाळ झुकला; भारतीय न्यूज चॅनेलवरील बंदी हटवली
शनिवारी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या मास्क घातला होता. आरोग्य विभागाकडून वाढणारा दबाव आणि देशातील वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या यामुळे त्यांनी मास्क वापरला असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रम्प यांनी राष्ट्रपतीच्या शिक्क्याचा खास असा काळा मास्क घातला होता. ट्रम्प वॉशिंग्टनच्या बाहेरील वाल्टर रीड सैन्य रुग्णालयात जखमी माजी सैनिकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मास्क वापरला. 

मी मास्क वापरण्याच्या कधीही विरोधात नव्हतो. फक्त कधी आणि कुठे वापरायचा हे आपल्याला कळायला हवं, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी जो बायडेन यांना मास्क घातल्यावरुन खिजवलं होतं. ट्रम्प यांनीही आता मास्क वापरणे सुरु केल्याने त्यांचे चाहतेही याचं अनुकरण करतील अशी अपेक्षा आहे. 

ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
कोरोना विषाणूने अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरोनामुळे फ्लोरिडा राज्य सर्वाधित प्रभावित झाले आहे. गेल्या 24 तासात फ्लोरिडामध्ये 15 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे हॉटेल, पार्क, पब्स अशा ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. असे असले तरी अमेरिकेतील काही राज्यांनी मास्क वापरणे अनिवार्य केलेलं नाही.

दरम्यान, जगभरातील कोरोनाचा प्रसार वाढत आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी जगभरात 2 लाख 30 हजार कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोना विषाणू अमेरिका खंडात हेदौस घालत आहे. येथे एका दिवसात 1 लाख 40 हजार रुग्ण सापडले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking to hear the number of corona patients in America