सिद्धूचे पाक लष्करप्रमुखांना अलिंगन

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सिद्धू यांना या शपथविधीसाठी मानाचे स्थान देण्यात आले होते. पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी सिद्धू यांचे आसन होते. शपथविधीपूर्वीच्या काही वेळात त्यांचे हे गळाभेट प्रकरण घडल्यामुळे उपस्थितांमध्येही चर्चेला विषय मिळाला.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला काँग्रेसचे नेते व भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना खास आमंत्रण होते. त्यांनीही या शपथविधीला उपस्थिती लावली. यावेळी शपथविधी दरम्यान सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. सिद्धू शपथविधीला गेल्याने पहिल्यापासूनच त्यांच्यावर टीका होत होती व आता या गळाभेटीमुळे सिद्धू चर्चेचा विषय ठरले आहेत. 

सिद्धू यांना या शपथविधीसाठी मानाचे स्थान देण्यात आले होते. पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी सिद्धू यांचे आसन होते. शपथविधीपूर्वीच्या काही वेळात त्यांचे हे गळाभेट प्रकरण घडल्यामुळे उपस्थितांमध्येही चर्चेला विषय मिळाला.

'सिद्धू हे जबाबदार नेते व मंत्री आहेत, फक्त तेच सांगू शकतील त्यांनी असे का केले, पण त्यांनी ही गोष्ट टाळायला हवी होती.' असे जम्मू-काश्मिरचे काँग्रेस प्रमुख गुलाम अहमद मीर यांनी सांगितले. तर, 'सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता, तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाण्यास नकार दिला असता, ते मित्रत्वाच्या नात्याने गेले आहेत, पण मैत्री ही देशापेक्षा मोठी नाही,' असे काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी सांगितले. 

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा इस्लामाबादमध्ये पार पडला. तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख व पाकिस्तानचे माजी क्रिकेटर इम्रान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून काम बघतील. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siddhu hugs Pakistan army chief