गरीब देशांसमोर भुकेचा प्रश्नच मोठा; आफ्रिकी देशांतील स्थिती गंभीर होणार

वृत्तसंस्था
Wednesday, 29 July 2020

जगातील कुपोषणाची समस्या वाढल्याने याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात ते अनेक पिढ्यांना संकटात आणू शकतात असे अभ्यास संस्थांचे म्हणणे आहे.बुरकीना फासोसारख्या गरीब आफ्रिकी देशांतील स्थिती आणखी गंभीर होऊ शकते

न्यूयॉर्क - जागतिक अर्थकारणाला ग्रासणाऱ्या कोरोनाच्या संकटाने सर्वांसमोरच एक मोठे आव्हान निर्माण केले आहे, विषाणूच्या संसर्गामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून शेती आणि बाजारपेठेचा संपर्क तुटल्याने मोठे अन्न संकट निर्माण झाले आहे.

पूर्वीपासूनच अन्न सुरक्षिततेच्या समस्यांना सामोरे जाणारे देश आणि विविध समुदाय यांना याची  मोठी किंमत मोजावी लागणार आहे. केवळ भुकेपोटी दरमहा दहा हजारांपेक्षाही अधिक तरुण मुलांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात आला आहे. जगातील बहुसंख्य देशांतील खेडी ही आजही वैद्यकीय मदतीपासून कोसो दूर असल्याचे आढळून आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जगातील कुपोषणाची समस्या वाढल्याने याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात ते अनेक पिढ्यांना संकटात आणू शकतात असे अभ्यास संस्थांचे म्हणणे आहे. बुरकीना फासोसारख्या गरीब आफ्रिकी देशांतील स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. या कुपोषणाचे विपरीत परिणाम हे लहान मुलांच्या शारीरिक  आणि मानसिक आरोग्यावर होण्याचा धोका असतो अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेचे पोषण विभागाचे प्रमुख फ्रान्सिस्को ब्रँका यांनी व्यक्त केली आहे. 

धडपड तीव्र होणार 
लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिकी खंडातील देशांमध्ये अनेक कुटुंबांना आत्तापासून भुकेचा प्रश्‍न सतावू लागला आहे. या देशांतील लोकांची अन्नासाठीची धडपड कोरोनामुळे आणखी तीव्र होणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. कुपोषणामुळे दरमहा पाच लाखांपेक्षाही अधिक मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व येते. मागील वर्षी अशा मुलांची संख्या ही ४७ दशलक्ष होती आता त्यामध्ये आणखी ६.७ दशलक्षांची भर पडणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थिती भीषण
सुदानसारख्या गरीब आफ्रिकी देशांमध्ये अर्थव्यवस्था कोलमडल्या असून अनेकांच्या हाताला काम शिल्लक राहिलेले नाही तसेच उत्पन्नाचे स्रोत देखील पूर्णपणे आटले आहेत. या देशामध्ये  महागाईचा दर हा १३६ टक्क्यांवर पोचल्याने जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव देखील तिप्पट झाले आहेत. यामुळे सर्वच लोकांना फार काटकसर करत जीवन कंठावे लागत आहे.

आव्हानांचा डोंगर
शाळा बंद असल्याने पोषण आहाराचे वितरण ठप्प
अफगाणिस्तानात निर्बंधांमुळे मुलांचे कुपोषण
येमेनमध्ये वेतन ठप्प झाल्याने रोकड संपली
जागतिक निधीचा ओघ आटल्याने लोकांची उपासमार
सुदानमध्ये ९.७ दशलक्ष लोक आजही एकवेळ जेवतात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: situation in African countries problem of hunger is big for poor countries