सोशल मीडियामुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

इंग्लंडमधील 13 ते 16 वयोगटातील जवळपास 10 हजार मुलांच्या मुलाखती घेतल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला आहे.

लंडन : सोशल मीडियाचा अधिक वापर आपल्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे याआधीही सांगण्यात आले आहे. मात्र हा धोका किशोरवयीन मुलां-मुलींत अधिक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

इंग्लंडच्या 'द लॅन्सेट चाइल्ड अँड अ‍ॅडॉल्संट हेल्थ' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणासाठी संस्थेने इंग्लंडमधील 13 ते 16 वयोगटातील जवळपास 10 हजार मुलांच्या मुलाखती घेतल्या. ज्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या मानसिकतेवर अधिक परिणाम होत असल्याचे या संस्थेने सांगितले आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या रॅगींगचा मुली अधिक प्रमाणात बळी पडतात. ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. 

तसेच या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरील काही प्रेरणादायक पोस्ट या फायदेशीर असतात. मात्र काही आक्षेपार्ह पोस्टमुळे त्या पाहणाऱ्यांना त्रास होतो. ज्यात खासकरुन किशोरवयीन मुलां-मुलींचा समावेश होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापराच्या वेळेसह त्यावर कोणत्या गोष्टी फॅालो करतो हे देखील महत्त्वाचे असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.  
 

web title : Social media use threatens children's mental health


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social media use threatens children's mental health