मंडेलांची सुटका करणारा आणि दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा वसाहतवादी नेता

मंडेलांची सुटका करणारा आणि दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा वसाहतवादी नेता
Summary

जगाच्या इतिहासात उघडपणे रंगभेद व वसाहतवादी भूमिकेचे सरकार चालविणारे दक्षिण आफ्रिकेच्या या शेवटच्या नेत्याचे निधन झाले. मंडेला यांची तब्बल 27 वर्षांच्या कारावासातून त्यांनी मुक्तता केली होती.

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व नंतर आलेल्या राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या सरकारमधील उप राष्ट्राध्यक्ष फ्रेड्रिक विल्यम डी क्लर्क यांचे त्यांच्या केपटाऊन नजिकच्या निवासस्थानी वयाच्या 85 व्या वर्षी गुरूवार दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी कर्करोगाने निधन झाले. 1989 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झाले. जगाच्या इतिहासात उघडपणे रंगभेद व वसाहतवादी भूमिकेचे सरकार चालविणारे दक्षिण आफ्रिकेचे ते शेवटचे नेते होत. तसेच, वसाहतावादाला औपचारिकरित्या मूठमाती देत अनेक वर्षे चाललेल्या संघर्षाला सकारात्मक प्रतिसाद देत फेब्रुवारी 1990 मध्ये मंडेला यांची तब्बल 27 वर्षांच्या कारावासातून मुक्तता करणारेही क्लर्क हेच नेते होत. 1990 ते 1994 दरम्यान मंडेला व क्लर्क व त्यांचे सरकारी यांच्यात झालेल्या वाटाघाटीत दक्षिण आफ्रिकेत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे ठरले.

27 एप्रिल 1994 रोजी झालेल्या निवडणुकीत मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला (एएऩसी) बहुमत मिळून तो पक्ष सत्तेवर आला. तथापि, सत्ता हाती येताच कृष्णवर्णीय व श्वेतवर्णीय यांच्यातील तीव्र मतभेदांमुळे देशात अशांतता माजू नये, यासाठी मंडेला यांनी एएनसी, क्लर्क यांची नॅशनल पार्टी व क्वाझुलू नाताळमधील इंकाथा फ्रीडम पक्ष (आयपीएफ) यांचे संयुक्त सरकार (गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल युनिटी) बनविले व त्यात क्लर्क यांना व एएनसीचे ज्येष्ठ नेते थाबो एम्बेकी यांना उपराष्ट्राध्यक्ष नेमले. दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासात मंडेला व क्लर्क यांच्यातील वाटाघाटी यशस्वी होणे, ही जगाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची व सकारात्मक घटना होती. त्यासाठी त्या दोघांना शांततेचे संयुक्त नोबेल पारितोषक बहाल करण्यात आले. तथापि, सरकारमधील ही नैसर्गिक युती नव्हती. जगातील संसदेत सर्वसाधारणतः सत्तारूढ पक्ष एका बाजूला व विरोधक समोरच्या बाकांवर बसण्याची प्रथा आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या संसदेत हे तिन्ही पक्षांचे नेते सरकारी बाकांवर व नॅशनल पार्टी (एन पी) व इंकाथा फ्रीडम पक्ष (आयएफपी) यांचे सदस्य मात्र विरोधकांच्या बाकांवर बसायचे. ते सरकारमध्ये असल्यामुळे सरकारी धोरणांचे समर्थन करायचे व दुसरीकडे संसदेबाहेर सरकारच्या निर्णयावर सडकून टीका करायाची, असे अत्यंत कठीण व परस्परविरोधी कार्य करण्याची वेळ एनपी व आयएफपीवर आली.

साडे तीनशे वर्षांचा वसाहतवाद व अत्याचार यामुळे श्वेतवर्णीयांविरूद्ध निर्माण झालेली कमालीची घृणा व द्वेष यामुळे देश पेटून उठला असता. परंतु, नेल्सन मंडेला यांच्या उत्तुंग व विशाल नेतृत्वाच्या आवाहनामुळे रक्तपात होण्याचे टळले. जनतेच्या तीव्र भावनांना शमविण्यासाठी मंडेला यांनी रेनबो नेशन (इंद्रधनू देश) ची संकल्पना मांडली व कृष्णवर्णीय, श्वेतवर्णीय, अन्य वर्णीय व भारतीय वंशाच्या लोकांनी तिचे स्वागत केले. परिणामतः दक्षिण आफ्रिकेत शांतता प्रस्थापित झाली. तथापि, आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत (1989 ते 1994) व त्याआधी वसाहतवादी सरकारने कृष्ण व अन्य वर्णीयावर जे अनन्वित अत्याचार केले, त्याची कबूली क्लर्क यांनी कधीच दिली नाही, म्हणून मंडेला, त्यांचे सहकारी, इंकाथा पक्षाचे नेते, तसेच जनतेत नाराज होती. त्यांच्यात पश्चाःतापाची भावना नाही, अशी टीका होत होती. पण जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांना उपरती झाली म्हणून की काय त्यांनी अलीकडे व्हिडिओद्वारे दिलेल्या अखेरच्या संदेशात कृष्णवर्णीय, अऩ्य वर्णीय व भारतीय वंशाच्या लोकांची माफी मागितली. त्यात त्यांनी जे म्हटले आहे, त्याचा हा सारांश - `` माझा देशाला हा शेवटचा निरोप आहे. ज्यांनी मला पाठिबा दिला, त्यांचे सर्वाचे आभार. पहिला विषय आहे, वंशभेद. माझ्यावर आजही आरोप होतो, की मी वंशभेदाचा पाठिराखा होतो. तरूण असताना मी त्याला पाठिंबा दिला, हे खरे. पण, नंतरच्या जीवनात मी त्याचा अनेकदा विरोध केला. म्हणूनच पुन्हा सांगतो, की वंशभेदामुळे ज्यांच्यांवर अत्याचार, भेदभाव झाले, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला कळून चुकले की वर्णभेद वाईट होता. माझ्यात झालेले हे परिवर्तन होय. नॅशनल पार्टीचा मी अध्यक्ष झालो. व नंतर राष्ट्राध्यक्ष असताना आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. दुसरा विषय म्हणजे, राज्यघटना निर्मिती. ती प्रक्रिया आम्ही 1996 मध्ये पूर्णत्वास नेली. मी आवाहन करतो की घटनेला कवटाळा, तिच्याशी एकनिष्ठ रहा. आपल्याला वंशभेद संपवायचा आहे. आपल्याला स्वातंत्र्य टिकवून ठेवयाचे आहे. त्यासाठी केवळ विचारसरणी (आयडियालॅजी) नव्हे, तर घटनेनुसार आपण वर्तन केले पाहिजे, तरच आपल्याला सारे काही साध्य होईल. देशाने तो संकल्प करावा, हीच माझी इच्छा.’’

क्लर्क यांचे `द लास्ट ट्रेक, ए न्यू बिगिनिंग’ हे आत्मचरित्र 1998 मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात मंडेला यांच्याबरोबर झालेल्या वाटाघाटींचा महत्वाचा तपशील वाचायला मिळतो. परंतु, त्यांच्या सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिले वर्ष सोडले, तर कोणकोणत्या मुद्यांवर त्यांचे मतभेद झाले, याचे तपशीलही त्यांनी दिले आहेत. मंडेला यांनी पहिले मंत्रिमंडळ बनविले, तेव्हा झालेला खातेपालट एकतर्फी होता, असे सांगताना ते म्हणतात, की 6 मे 1994 रोजी मंडेला यांनी जो खातेपालट जाहीर केला, तो ऐकून मला धक्का बसला. 18 मंत्रीपदे नेमताना एएऩसीने मला यत्किंचितही विश्वासात घेतले नाही. घटनेतील मूल्यांचे अवमूल्यन झाले. पण नॅशनल पार्टीला देण्यात येणाऱ्या खात्यांबाबत मात्र त्यांनी माझ्याशी सल्लामसलत केली. महत्वाच्या चार मंत्रालयात (सुरक्षा, सामाजिक विकास, अर्थ व शासन) मला नॅशनल पार्टीचा नेता हवा होता. परंतु, राष्ट्रीय सुरक्षेविषयक सर्व खाती त्यांनी एएऩसीकडे ठेवली. आम्हाला अर्थ, खनिज विभाग, ऊर्जा, पर्यावरण, शेती, कल्याण व लोकंसंख्या विकास, प्रांतीय कारभार व घटनात्मक कारभार ही खाती देण्यात आली. त्यामुळे, नॅशनल पार्टीच्या नेत्यात बरीच नाराजी पसरली. तरीही सरकारच्या स्थैर्याला आम्ही कोणताही धक्का लागू दिला नाही.

मंडेलांची सुटका करणारा आणि दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा वसाहतवादी नेता
तुरुंगात ड्रग्ज तस्करांचे गँगवॉर; ५२ कैद्यांचा मृत्यू

1996 पर्यंत क्लर्क मंडेला यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष पदावर होते. परंतु, अखेर नॅशनल पक्षाने राष्ट्रीय अयक्यांच्या सरकारमधून माघार घेतली. नंतर आलेल्या राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बेकी यांच्या सरकारच्या काळात ते विरोधी पक्ष नेते होते. 1997 मध्ये क्लर्क यांनी राजकारण सन्यास घेतला. तेव्हापासून ते नॅशनल पार्टीच्या सल्लागाराची भूमिका बजावत होते.

थाबो एमबेकी यांच्या नंतर आलेल्या जेकब झुमा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत बोकाळलेला भ्रष्टाचार, भारतीय वंशाच्या लोकांविरूद्ध झालेले दंगे, बिघडलेली आर्थिक, सामाजिक व राजकीय घडी बसविण्याचे कठीण कार्य विद्यमान राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा करीत असले, तरी मंडेलाच्या कारकीर्दीतील सामाजिक सामंजस्यांचे वातावरण उरलेले नाही. त्यामुळे, रामफोसा यांना मंडेलांचे इंद्रधनू राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मह्तप्रयत्न करावे लागत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com