SpaceX च्या रॉकेटचं उड्डाणानंतर यशस्वी लँडिंग; मात्र काही क्षणातच स्फोट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

तीनवेळा प्रयत्न केल्यानंतर पहिल्यांदाच रॉकेटने यशस्वी उड्डाण करत लँडिंग केलं होतं. 

वॉशिंग्टन : एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज् कॉर्पोरेशन (SpaceX) चे नवं आणि सर्वांत मोठं रॉकेट आपल्या तिसऱ्या टेस्ट फ्लाईटमध्ये पहिल्यांदा यशस्वीरित्या लँड झालं. मात्र थोड्याच वेळात त्याचा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. बुधवारी अमेरिकेच्या टेक्सासमधील स्पेसएक्समधून स्टारशिप एसएन10 स्पेसक्राफ्ट संध्याकाळी 5.15 वाजता बोला चिका येथून लाँच केलं गेलं होतं. त्याचा एक व्हिडीओ देखील स्पेसएक्सने आपल्या वेबसाईटवर जाहीर केला आहे. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटने लँड पॅडला स्पर्श करण्याआधी 10 किमीच्या उंचीपर्यंत उड्डान केलं होतं. मात्र, लँडीगनंतर लगेचच रॉकेटचा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. तीनवेळा प्रयत्न केल्यानंतर पहिल्यांदाच रॉकेटने यशस्वी उड्डाण करत लँडिंग केलं होतं. 

या रॉकेटचे यशस्वी लँडींग स्पेस ट्रॅव्हलच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरलं असतं. जर ते यशस्वी झालं असतं तर एलॉन मस्क यांच्या चंद्रावर प्रवास करण्याच्या योजनेच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल पडलं असतं. एलॉन मस्क यांच्या या योजनेनुसार 2023 पर्यंत 12 लोकांना चंद्रावर पाठवणार आहेत. यासोबतच नासाच्या अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर तसेच मंगळावर पाठवणे देखील या योजनेत समाविष्ट आहे. मात्र, कंपनी सध्या आपल्या पहिल्याच उड्डानासाठी स्टारशीप तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. हे काम या वर्षीच्या अखेरिस पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - आत्मनिर्भर भारताचे 'ब्रह्मोस' खरेदी करणार फिलीपाईन्स; थायलंड-इंडोनेशियाशी चर्चा सुरु

याआधी मंगळवारी एलॉन मस्क यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलं होतं की, मला खात्री आहे की, 2023 च्या आतच अनेकवेळा स्टारशीपसोबत ऑर्बिटपर्यंत पोहोचू आणि 2023 पर्यंत तिथे मानवांला जाणे शक्य होईल. याआधी स्टारशीप रॉकेटचा गेल्या वर्षी 9 डिसेंबरला याचपद्धतीने स्फोट झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SpaceX biggest rocket first successful landing then explodes