अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांचा विक्रम; 'स्पेलिंग बी'मध्ये सात विजयी

पीटीआय
शनिवार, 1 जून 2019

अमेरिकेतील प्रतिष्ठित 2019 स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाचे सात विद्यार्थी विजयी ठरले आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील प्रतिष्ठित 2019 स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाचे सात विद्यार्थी विजयी ठरले आहेत. 50 हजार डॉलर रोख बक्षीस असलेल्या या स्पर्धेतील हा विक्रम आहे. 550 विद्यार्थ्यांना मागे टाकून या सात विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा जिंकली. विजेत्यांमध्ये एक अमेरिकन विद्यार्थीही आहे. 

दोनपेक्षा अधिक विजेते जाहीर करण्याच्या स्पर्धेत 94 वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. रिषिक गंधश्री (वय 13, कॅलिफोर्निया), साकेत सुंदर (13, मेरिलॅंड), श्रुतिका पाधे (13, न्यूजर्सी), शुभम सुखटणकर (13, टेक्‍सास), अभिजय कोडाली (12, टेक्‍सास), रोशन राजा (13, टेक्‍सास), ख्रिस्तोफर सिराओ (13, न्यूजर्सी) आणि एरिन हॉवर्ड (14, अलाबामा) हे सहविजेते आहेत. स्पर्धेचे बक्षीस विभागून न देता प्रत्येकाला 50 हजार डॉलर रोख मिळणार आहेत. या स्पर्धेची काठिण्य पातळी प्रत्येक टप्प्यानुसार वाढत जाते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या पाच सलग टप्प्यांमध्ये सहा मुले व दोन मुलींनी अंतिम 47 शब्दांची स्पेलिंग अचूक लिहिली. 

मेरिलॅंडमधील नॅशनल हार्बरमधील गेलॉर्ड नॅशनल रिसॉर्टमध्ये स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. 28) केले होते. यात अमेरिकेसह कॅनडा, घाना, जमैका आदी देशांमधील 7 ते 14 वर्ष वयोगटातील 565 स्पर्धकांनी भाग घेतला होता. 'ईएसपीएन' वाहिनीने याचे राष्ट्रीय पातळीवर प्रसारण केले. ''यापूर्वी कधीही सहभागी न झालेल्या प्रदेशांतील विद्यार्थी यंदा स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्वांत उत्कृष्ट 'स्पेलर'चा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट ठरले,'' अशी माहिती अधिकृत प्रवक्ते जॅक्‍स बेली यांनी दिली.

यातील बहुतेक "स्पेलर'ना वैयक्तिक मार्गदर्शक होता. स्पर्धेतील माजी विजेते शोभा दासरी आणि तिचा लहान भाऊ सौरव यांनी तयार केलेले अभ्यासाचे साहित्य व पूर्वीच्या 16 पैकी 13 शब्दांची यादी स्पर्धकांना दिली होती, असेही ते म्हणाले. 

विजेत्यांची अचूक स्पेलिंग 
गंधश्री- auslaut 
हॉवर्ड- erysipelas 
सुंदर-bougainvillea 
पाधे - aiguillette 
सुकटणकर- pendeloque 
कोडाली- palama 
सिराओ- cernuous 
राजा -odylic 

भारतीयांचीच छाप 

गेल्या वर्षी या स्पर्धेत कार्तिक नेमानी हा अमेरिकेतील 14 वर्षांचा भारतीय वंशाचा विद्यार्थी विजेता ठरला होता. 42 हजार डॉलर रोख व अन्य बक्षिसे त्याने पटकाविली होती. त्याने "कोइनोनिया' (koinonia) या शब्दाचे स्पेलिंग अचूक लिहिले होते. कार्तिक हा सलग 11 वर्षांतील 14 वा भारतीय वंशाचा विजेता ठरला होता. 2017 मध्ये अनया विनय या भारतीय वंशाच्या मुलीने ही स्पर्धा जिंकली होती. 2014 ते 2016 या काळात दोन विजेत्यांची निवड करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spelling Bee Record seven children win Scripps National in the US