श्रीलंकेत आज रात्रीपासून आणीबाणी लागू होणार : राष्ट्रपती

वृत्तसंस्था
सोमवार, 22 एप्रिल 2019

श्रीलंकेत रविवारी (ता. 21) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 290 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे.

कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण देश हादरला असून, देशात आज (सोमवार) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू केली जाणार आहे, अशी घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांनी केली.

श्रीलंकेत रविवारी (ता. 21) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 290 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे. श्रीलंकन पोलिसांनी या बॉम्बस्फोटप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक केली आहे. स्फोटांनी देश हादरल्यानंतर देशातत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. भारताकडून मदत म्हणून एअर इंडियाने 24 एप्रिलपर्यंत कोलंबोहून येणारी-जाणारी तिकीटे रद्द किंवा पुढची तारीख निवडल्यास त्यावर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीहून कोलंबोसाठी दररोज दोन विमानांचे उड्डाण होईल तर चेन्नईहून कोलंबोला जाण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे दररोज एक उड्डाण होईल.

दरम्यान, ईस्टर संडेनिमित्त भाविकांनी सकाळी विविध चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी केली असताना कोलंबोमधील सेंट अँटोनी चर्च, नेगोम्बो गावातील सेंट सेबॅस्टिअन चर्च आणि बॅटिकालोआ येथील एका चर्चमध्ये, तसेच कोलंबोमधील शांग्री-ला, सिनेमॉन ग्रॅंड आणि किंग्जबरी या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकाच वेळी बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले. रविवारी (ता. 21) सकाळी 8.45 च्या सुमारास तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हल्लेखोरांनी घडवून आणला. दुपारी आणखी दोन बॉंबस्फोटांमध्ये आणखी पाच जणांचे प्राण गेले. या स्फोटांमुळे "एलटीटीई'च्या पतनानंतर गेले श्रीलंकेत गेले दशकभर असलेली शांतता भंग पावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मृतांमध्ये भारत, चीन, अमेरिका, ब्रिटनसह काही इतर देशांमधील 11 हून अधिक नागरिकांचाही समावेश आहे. जखमींमध्ये पाकिस्तान, अमेरिका, मोरोक्को आणि बांगलादेशच्या नागरिकांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lanka President Maithripala Sirisena to declare nationwide emergency