Breaking News: इंडोनेशियात 62 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाचा संपर्क तुटला, काही क्षणात रडारवरुन गायब

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 9 January 2021

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या श्रीविजया एअर फ्लाइट 182 चा संपर्क तुटला आहे.

नवी दिल्ली- इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाले आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, श्रीविजया एअर कंपनीच्या SJ 182 या विमानात 12 कर्मचाऱ्यांसह 62 प्रवासी होते. या विमानाचा शोध सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत विमानाचे लोकेशन समजू शकलेले नाही. फ्लाइट रडार 24 नुसार हे विमान बोइंग 737-500 मालिकेतील आहे. शनिवारी दुपारी जकार्ता येथील सुकिर्णो हत्ता विमानतळावरुन उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर चार मिनिटांतच विमानाचा संपर्क तुटला होता. दरम्यान, रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जकार्ता शहरातील समुद्रात संशयास्पद अवशेष आढळून आले आहेत. 

या विमानाशी दुपारी 2.40 मिनिटांनी शेवटचा संपर्क झाल्याचे वाहतूक मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले आहे. रडारनुसार या विमान एका मिनिटांत 10 हजार फूट उंचीवरुन खाली आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या विमानाचा मोठा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतक्या वेगाने जर विमान खाली आले तर ते कोसळण्याची शक्यता मोठी असते. दुसरीकडे इंडोनेशियाच्या सरकारने मदत कार्यासाठी पथके तैनात केली आहेत.  विमानाबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे विमान कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

जकार्ताहून बेपत्ता झालेले विमान बोइंग 737 मॅक्स मालिकेतील आहे. या विमानाच्या सुरक्षेवर यापूर्वी अनेकवेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. बोइंग या विमानाचे उत्पादन बंद करण्याचा विचार करत असल्याचेही बोलले जात आहे. या विमानाची सर्वात मोठी समस्या ही याच्या इंजिनमध्ये आहे. इंधनाची बचत होत असली तरी इंजिनमध्ये समस्या असल्यामुळे याचा वेग कमी होऊ शकतो आणि विमान बंद पडू शकते. या समस्येशी सामना करण्यासाठी कंपनीने एक एमसीएएस नावाचे सॉफ्टवेअर विमानात लावले आहे. परंतु, अनेकवेळा याचे सॉफ्टवेअरही चुकीची माहिती देते. त्यामुळे विमान अपघातग्रस्त होण्याची शक्यता वाढते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sriwijaya Air flight SJ182 lost more in less than one minute after departure from Indonesia Jakarta