Brainless JellyFish: शिकण्यासाठी डोकं लागत नाही; जेलीफिशच्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर | Study Finds that it does not need brain to learn things Box jellyfish study shows | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Box Jelly Fish
Brainless JellyFish: शिकण्यासाठी डोकं लागत नाही; जेलीफिशच्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर

Brainless JellyFish: शिकण्यासाठी डोकं लागत नाही; जेलीफिशच्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर

जगभरात सगळीकडेच एखादी गोष्ट शिकताना म्हटलं जातं की जरा डोकं लाव, जरा डोकं लाव. काही जण तर इतकं डोकं लावतात की जरा जास्तच क्रिएटिव्हिटी करून बसतात. काही जण या गोष्टीचा चुकीचा वापरही करतात. पण शिकण्यासाठी डोकं असायलाच हवं असं काही नाही. हे आम्ही नाही, एक अभ्यास म्हणतो आहे.

बॉक्स जेलीफिशबद्दल करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हे समोर आलेलं आहे. त्यामुळे किमान जेलीफिशला तरी शिकण्यासाठी डोकं वापरण्याची गरज पडत नाही. कॅरेबियन खारफुटी जंगलामध्ये ही बॉक्स जेलीफिश नेहमी आढळते. यांचं शरीर पारदर्शक असतं. बॉक्स जेलीफिश इतर जेलीफिशपेक्षा वेगळ्या असतात. या वेगळेपणाचं कारण म्हणजे त्यांचं पारदर्शक शरीर. या जेलीफिशचा पुढचा भाग द्राक्षाच्या आकाराचा असून त्याला २४ डोळे असतात. पण यांच्याकडे डोकं म्हणजे मेंदू नसतो.

आपल्या चौकोनी आकाराच्या शरीराला जेलीफिश न्यूरॉन्सच्या जाळ्याच्या साहाय्याने सांभाळते. हे न्यूरॉन्सचं जाळं अत्यंत क्लिष्ट असतं. यासंदर्भात करंट बायोलॉजी जर्नलमध्ये वैज्ञानिकांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की बॉक्स जेलीफिशची ट्रायपेडालिया सिस्टोफोरा ही प्रजाती डोकं नसतानाही नव्या गोष्टी शिकू शकते. वैज्ञानिकांनी या जेलीफिशला अनेक गोष्टी दाखवल्या आणि शिकवल्या. या जेलीफिश आपले २४ डोळे वापरतात आणि शिकतात. डोळ्यांना जे दिसतं ते न्यूरॉन्सच्या जाळ्यामध्ये जाऊन त्यावर प्रक्रिया होते. व्हिज्युअल प्रोसेसिंगद्वारे हे जेलीफिश आपलं लक्ष्य निश्चित करून प्रवास करते.

वैज्ञानिक या जेलीफिशला नवनव्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नव्हे तर जेलीफिश फक्त आपल्या मज्जासंस्थेच्या आधारावर समुद्रातली आपली शिकार शोधतात आणि आपल्यावर होणारा हल्लाही ओळखतात. अशा पद्धतीने शिकण्याच्या प्रक्रियेला असोसिएटिव्ह लर्निंग म्हणतात. या जेलीफिशची शिकण्याची ताकद पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी त्याला एका काचेच्या बॉक्समध्ये टाकलं. त्यामध्ये खारफुटी वनस्पतींची मुळं टाकली.

याशिवाय अडथळे निर्माण करण्यासाठी राखाडी रंगाच्या पट्ट्याही टाकल्या. साडेसात मिनिटांमध्ये या जेलीफिशला कळलं की या पट्ट्या आपल्याला अडथळा आणत आहेत आणि त्यांनी आपला मार्ग बदलला. मुळांच्या दिशेने गेली.

टॅग्स :jelly fish