२६/११ हल्ल्यातील कामगिरीबद्दल सर्वोच्च पदक द्या; तहव्वूर राणाची पाकिस्तानकडे मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 1 December 2020

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे.

वॉशिंग्टन- मुंबईवरील हल्ल्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल मला पाकिस्तान सरकारने सर्वोच्च पदक द्यावे, अशी मागणी दहशतवादी तहव्वूर राणा याने केली असल्याचे अमेरिका सरकारने येथील न्यायालयात सांगितले. केवळ आपल्यालाच नाही तर, २६/११ चा हल्ला करणाऱ्या लष्करे तैयबाच्या नऊ दहशतवाद्यांनाही पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान दिला जावा, अशी मागणी राणाने केली आहे.

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक असलेल्या डेव्हीड कोलमन हेडलीचा तो बालमित्र असून या हल्ल्यातील सहभागीही आहे. भारताने त्याच्या हस्तांतरणाची मागणी केल्यानंतर जूनमध्ये राणाला अमेरिकी पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. आपण पळून जाण्याचा धोका नसल्याने सोडून द्यावे, अशी मागणी राणाने केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. राणाला ताब्यात देण्याच्या भारताच्या मागणीचे समर्थन करताना अमेरिकेतील वकील निकोला टी. हॅना यांनी दहशतवाद्यांच्या कटाची माहिती दिली. 

Farmers Protest: पहिल्या बैठकीत तोडगा नाही; शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरुच राहणार

‘राणा, हेडली आणि लष्करे तैयबाच्या इतरांनी २६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान दहा दहशतवाद्यांनी बारा ठिकाणी गोळीबार आणि बाँबहल्ले करत कटाची अंमलबजावणी केली. भारताने एका दहशतवाद्याला अटक करत त्याला न्यायालयामार्फत शिक्षाही दिली. मुंबई हल्ल्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये हेडली आणि राणा यांच्यात या हल्ल्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानमधील सूत्रधारांकडून आपण काय शिकलो, याची माहिती देतानाच हेडलीने राणाला त्याने हल्ला केलेल्या ठिकाणांची माहितीही दिली. या ठिकाणांचे व्हिडिओ चित्रीकरणही त्याने केले होते,’ असे हेडलीने सांगितले होते. हेडली या प्रकरणात माफीचा साक्षीदार आहे.

आमच्या अंतर्गत मुद्यांमध्ये ढवळाढवळ करु नका; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने...

राणा आणि हेडली यांचा दूरध्वनीवरील संवाद अमेरिकेची तपास संस्था ‘एफबीआय’ने टॅप केला. त्यानुसार, मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार मिळायला हवा, असे राणाने हेडलीला म्हटले होते. आपल्यालाही एखादे सर्वोच्च पदक मिळावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती. हेडलीने तशी शिफारस मुख्य सूत्रधारांकडे केल्याचे समजताच राणाने आनंद व्यक्त केला होता, असे वकील हॅना यांनी न्यायालयात सांगितले. हेडलीने २००९ मध्ये डेन्मार्क येथेही हल्ल्याचा कट आखला होता, असे त्यांनी सांगितले. हेडलीला ऑक्टोबर २००९ मध्ये अटक झाली असून त्याने लष्करे तैयबाच्या माध्यमातून गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tahavvur rana demand to give award for mumbai attack