आमच्या अंतर्गत मुद्यांमध्ये ढवळाढवळ करु नका; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 1 December 2020

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त केली. कॅनडाचे खासदार बर्दिश चाग्गर यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या फेसबुक संवादात त्यांनी हे मत मांडले. मात्र, भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कॅनडाच्या पंतप्रधानाकडून करण्यात आलेले मतप्रदर्शन अनावश्‍यक आहे, अशी स्पष्टोक्ती आज भारतातर्फे करण्यात आली. शेतकरी आंदोलन ही भारतासारख्या लोकशाही देशातली एक अंतर्गत बाब आहे आणि राजनैतिक मतप्रदर्शनातून राजकीय हेतू ध्वनित केला जाऊ नये, असे प्रत्युत्तरही भारताने दिले आहे.

भारतात तीन कृषी-सुधारणा विषयक कायद्यांवरुन सुरु असलेल्या आंदोलनावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काल जाहीर टिप्पणी केली. गुरुनानक जयंतीनिमित्त कॅनडात आयोजित एका फेसबुक संवादात बोलताना त्यांनी हे मतप्रदर्शन केले. कॅनडात शीख समाज मोठ्या संख्येने आहे आणि त्यांचे नातेवाईक देखील या आंदोलनात सहभागी आहेत, असा संदर्भ देऊन त्रुदो यांनी या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आणि ही चिंता भारतीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. कॅनडाने नेहमीच शांततापूर्ण आंदोलनाला साथ दिली आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. 

चीनने निभावली मैत्री! किम जोंग उनला दिली कोरोना लस

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांना यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना प्रतिक्रिया देताना त्यांनी, ‘‘कॅनडातील काही नेत्यांकडून शेतकरी आंदोलनाबाबत काही चुकीच्या माहितीवर आधारित केलेल्या विधानाकडे आमचे लक्ष वेधण्यात आले आहे. परंतु त्या प्रतिक्रिया अनावश्‍यक आहेत आणि भारताच्या अंतर्गत बाबींवर आहेत' असे स्पष्ट केले. राजनैतिक निवेदने करताना त्यातून राजकीय हेतू ध्वनित होऊ नये असा टोलाही त्यांना लगावला.

ट्रुडो यांनी काय म्हटलं?

ट्रुडो यांनी गुरुपूरबच्या निमित्ताने कॅनडाच्या लोकांना खासकरुन शिख लोकांना शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओत त्यांनी शेतकरी आंदोलनाचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ट्रुडो यांनी पुढे म्हटलं की, आम्ही कुटुंब आणि नातेवाईकांसाठी चिंतीत आहोत. आम्हाला माहितीय की अनेक लोकांसाठी हे सत्य आहे. या आंदोलनाला समर्थन देत ट्रुडो यांनी म्हटलं की, कॅनडा नेहमीच शांततेने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करेल. आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनासमोर आमची ही काळजी व्यक्त केली आहे. ही वेळ सर्वांसोबत जाण्याची आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india reply after canada pm Justin Trudeau comment