इसिसच्या दहशतवाद्यांना न्या, अन्यथा सोडून देऊ : ट्रम्प

पीटीआय
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

सिरियात कारवाईदरम्यान पकडलेल्या इसिसच्या 800 दहशतवाद्यांना युरोपीय देशांनी घेऊन जावे आणि खटला चालवावा, अन्यथा त्यांना सिरियात सोडून देण्यात येईल, अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिला आहे.

वॉशिंग्टन : सिरियात कारवाईदरम्यान पकडलेल्या इसिसच्या 800 दहशतवाद्यांना युरोपीय देशांनी घेऊन जावे आणि खटला चालवावा, अन्यथा त्यांना सिरियात सोडून देण्यात येईल, अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिला आहे. डिसेंबरमध्ये ट्रम्प यांनी सिरियातून अमेरिकी सैनिक परत बोलावण्याची घोषणा केली आहे. सिरियात सध्या दोन हजारांहून अधिक अमेरिकी सैनिक तैनात असून, ते इसिसच्या दहशतवाद्यांच्या मुसक्‍या बांधण्याचे काम करीत आहेत. तत्पूर्वी कारवाईत पकडलेल्या 800 दहशतवाद्यांना संबंधित देशाच्या हवाली करण्याची अमेरिकेची योजना आहे. 

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांसह अन्य युरोपीय देशांना आवाहन करीत ट्रम्प यांनी म्हटले, की इसिसच्या 800 दहशतवाद्यांवर खटला चालवावा. जर, नियोजित वेळेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतले नाही, तर अमेरिकेला या दहशतवाद्यांना सोडून द्यावे लागेल. बंदिस्त दहशतवादी संपूर्ण युरोप देशात पसरावेत, अशी अमेरिकेची इच्छा नाही. मात्र, युरोपीय देशांनी त्यांना घेऊन जावे, अशी अपेक्षा आहे. आम्ही आतापर्यंत खूप काही केले आहे. आता युरोपीय देशांची जबाबदारी आहे. आम्ही खिलाफीच्या माध्यमातून शंभर टक्के विजय मिळवल्यानंतरच सिरियाबाहेर पडणार आहोत, असे ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

दरम्यान, सिरियातील आतापर्यंतच्या हिंसाचारात सुमारे साडेतीन लाख नागरिक मृत्युमुखी पडले असून, अनेक शहरांची नासधूस झाली आहे. सिरियातील हजारो नागरिकांनी अन्य देशांत स्थलांतर केले आहे. तर, अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांनी 2015 मध्ये सिरियात अमेरिकी सैन्यदलाच्या विशेष पथकाला पाचारण केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take away the terrorists of Isis otherwise leave it Trump