तालिबानी दहशतवाद्यांना "आयएसआय'चा पाठिंबा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

तालिबान्यांना त्यांच्या तळापासून कुचलक येथे जाण्यासाठी "आयएसआय'कडून आलिशान गाड्या पुरवल्या जातात. स्थानिक पोलिस हे 'आयएसआय' किंवा लष्कराच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याने तालिबान्यांना थांबविण्याची त्यांना परवानगी नाही

वॉशिंग्टन  - दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या "आयएसआय' गुप्तचर संस्थेचा तालिबानला पाठिंबा असून, त्यांना सीमा भागात मदत केली जात असल्याने ते दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे "वॉशिंग्टन टाइम्स'ने म्हटले आहे. या संदर्भात दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अफगाणीस्तानातील तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी लष्कराच्या छायेखाली क्वेट्टामध्ये सहज प्रवेश करू शकतात.

तेथे ते लष्कर आणि "आयएसआय'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करतात. प्रमुख तालिबानी नेते पश्‍तुनाबाद, गुलिस्तान आणि परिसरातून सर्व सूत्रे हलवतात; अशी आमची माहिती आहे. क्वेट्टापासून 44 किलोमीटर अंतरावर असलेल्या किल्ला अब्दुल्ला या सामेलगतच्या छोट्या जिल्ह्यात तालिबानी हे "आयएसआय'बरोबर काम करतात. अफगाणीस्तानातील या जिल्ह्यातील तालिबानचे वर्चस्व असलेला हा भाग चमन या नावाने ओळखला जातो. तेथील रहिवाशांना तालिब्ज म्हणून ओळखले जाते. येथे रस्त्यांवर अनेक तालिबानी दहशतवादी स्वयंचलित शस्त्रास्त्रांसह मोटारसायकल किंवा मोटारींमधून फिरताना आढळून येतात, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे म्हटले आहे.

तालिबान्यांना त्यांच्या तळापासून कुचलक येथे जाण्यासाठी "आयएसआय'कडून आलिशान गाड्या पुरवल्या जातात. स्थानिक पोलिस हे 'आयएसआय' किंवा लष्कराच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याने तालिबान्यांना थांबविण्याची त्यांना परवानगी नाही. कोणी अडवण्याचा प्रयत्न केल्यास ते पोलिसांना धुडकावून लावतात. दरम्यान, या परिसरात पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध अधिक पावले उचलण्याची अपेक्षा "पेंटागॉन'चे मुख्य प्रवक्ते डॅना व्हाईट यांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taliban isi pakistan south asia