'खोडकर महिलांना घरात ठेवतो', तालिबान नेत्याचं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taliban on woman rights

'खोडकर महिलांना घरात ठेवतो', तालिबान नेत्याचं वक्तव्य

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने महिलांबाबत (Taliban on Woman Rights) अतिशय उदारमतवादी धोरण राबविण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी आपले आश्वासन न पाळता मुलींना शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय मागे घेतला होता. पण, मुलींना शाळेत जाण्याची परवानगी देण्यात येईल. लवकरच खुशखबर मिळेल, असं अफगाणिस्तानचे कार्यवाहक मंत्री आणि तालिबानचा उपनेता सिराजुद्दीन हक्कानीने म्हटलं आहे.

तालिबानने अफगाणिस्तानची सत्तेवर ताबा मिळवला त्यावेळी त्यांनी महिलांविषयीच्या कायद्याविषयी उदारमतवादी धोरण राबवणार असल्याचे सांगितले होते. महिलांच्या हक्कांचे संरक्षण करू, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं होतं. पण, सत्तेत येऊन काही दिवस पूर्ण होत नाहीतर तालिबानने पुन्हा महिलांवर निर्बंध लादायला सुरुवात केली. मुलींना शाळेत जाण्याची बंदी घालण्यात आली. इतकंच नाहीतर हॉटेलमध्ये महिलांना जेवण्यास बंदी घालण्यात आली. महिला घराबाहेर निघताना पुरुष सोबत असावा, असा फतवा काढण्यात आल्याचंही वृत्त होतं. पण, आता मुलींना शाळेत जायला मिळेल, असं हक्कानीने म्हटलं आहे. पण, तालिबान राजवटीचा विरोध करणाऱ्या महिलांनी घराच बसावं, असा इशाराही हक्कानीने यावेळी दिला.

तालिबान राजवटीत घराबाहेर पडण्यास घाबरणाऱ्या महिलांबद्दल विचारले असता, आम्ही खोडकर महिलांना घरात ठेवतो. कारण, या महिला सरकारला संकटात आणतात, असं उत्तर हक्कानीने दिलं. सर्व महिलांना त्यांचे चेहरे झाकणे आवश्यक आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, ''आम्ही महिलांना [हिजाब] घालण्याची सक्ती करत नाही. परंतु आम्ही त्यांना वेळोवेळी सल्ला देत आहोत. हिजाब अनिवार्य नाही. परंतु हा इस्लामिक आदेश आहे ज्याची प्रत्येकाने अंमलबजावणी केली पाहिजे, असंही हक्कानी म्हणाला.

एफबीआय सिराजुद्दीन हक्कानीच्या शोधात आहे. त्याच्या डोक्यावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस असून त्याला यूएस स्टेट डिपार्टमेंटने "विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी" म्हणून घोषित केले आहे.