इराकमध्ये इसिसचे दहा हजार दहशतवादी सक्रीय!

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 August 2020

वोरोन्कोव्ह यांनी आज याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत माहिती दिली

न्यूयॉर्क- इसिसचा दोन वर्षांपूर्वी पराभव होऊनही या दहशतवादी संघटनेचे इराक आणि सीरियामध्ये दहा हजारहून अधिक सदस्य सक्रीय असल्याचा आणि या वर्षात त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख व्लादीमिर वोरोन्कोव्ह यांनी केला आहे. 

वोरोन्कोव्ह यांनी आज याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, इसिसचे दहशतवादी छोट्या छोट्या गटांमधून मुक्तपणे दोन्ही देशांमध्ये ये-जा करत आहेत. पराभवानंतर ही संघटना पुन्हा एक होत असून त्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. केवळ इराक आणि सीरियातच नाही, तर संलग्न प्रदेशांमध्येही ते हल्ले करत आहेत. अर्थात, त्यांच्या कारवाया वाढत असतानाच कोरोनाचा संसर्गही वाढल्याने हल्ल्यांच्या घटना कमी झाल्या. लॉकडाउन आणि इतर नियमांमुळे हालचाली बंद झाल्याने हे गट काही काळ शांत झाले होते. मात्र, इंटरनेटद्वारे त्यांचे सायबर हल्ले सुरुच आहेत, असे वोरोन्कोव्ह म्हणाले. युरोपमध्येही दहशतवादी सक्रीय आहेत. मात्र, ते सायबर हल्ल्यांद्वारे अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

आफ्रिकेतही कारवाया 

इसिसने आपला विस्तार आफ्रिका खंडातही केला असून येथे सुमारे ३५०० जण या संघटनेच्या माध्यमातून दहशतवादाकडे वळाले असल्याचे व्लादीमिर वोरोन्कोव्ह यांनी सांगितले. हे दहशतवादी बुर्किना फासो, माली आणि नायजर या देशांमध्ये बस्तान बसवत आहेत. या भागातील वांशिक वाद, गरीबी या मुद्यांचा दहशतवादी संघटना फायदा घेत असून अनेक युवकांची दिशाभूल करत आहेत. काँगो आणि मोझांबिक या देशांमधील हल्ले वाढल्याच्या घटनाही वोरोन्कोव्ह यांनी निदर्शनास आणून दिल्या. 

टीटीपी’चा ‘इसिस’शी जवळून संबंध 

अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रिया सुरु असतानाही तेहरीके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही दहशतवादी संघटना इराकमधील ‘इसिस’ आणि ‘इसिस-खोरासन’ या दहशतवादी संघटनांशी सूत जुळवून आहे, असे सिद्ध झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी तयार केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार, अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेचा गैरफायदा घेण्याचे ‘इसिस-खोरासन’चे उद्दीष्ट असून शस्त्रसंधीच्या या काळात ते तालिबानी आणि विदेशातील इतर दहशतवाद्यांना स्वत:कडे आकर्षित करून घेत आहेत. ‘इसिस’चा जागतिक शांततेला धोका या शीर्षकाखाली गुटेरेस यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी...

‘इसिस-खोरासन’ हा इराकमधील ‘इसिस’शी संबंधित दहशतवादी गट असून तो दक्षिण आणि वायव्य आशियात सक्रीय आहे. ‘टीटीपी’चा या गटाशी जवळून संबंध आहे. ‘टीटीपी’चे अनेक दहशतवादी खोरासन गटात सामीलही झाले आहेत. या गटाची ताकद कमी असली तरी अफगाणिस्तानात ते मोठे हल्ले करू शकतात, असे अहवालात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten thousand terrorists active in Iraq