17 व्या दिवशीही 'ती' चार मुले गुहेतच

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

थायलंडच्या उत्तरेकडील पर्वत रांगेतील थाम लुआंग नांग नोन या गुहेत अडकलेल्या ११ ते १६ वयोगटातील १२ मुुलांपैकी आठ मुलांना तब्बल १७ दिवसांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. उर्वरित चार मुले आणि त्यांच्या २५ वर्षीय प्रशिक्षकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे जवान प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.

चियांग राइ : थायलंडच्या उत्तरेकडील पर्वत रांगेतील थाम लुआंग नांग नोन या गुहेत अडकलेल्या ११ ते १६ वयोगटातील १२ मुुलांपैकी आठ मुलांना तब्बल १७ दिवसांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. उर्वरित चार मुले आणि त्यांच्या २५ वर्षीय प्रशिक्षकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे जवान प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. रविवारी चार मुलांना वाचविले. सोमवारी सायंकाळी चार मुलांना बाहेर काढले. तिसऱ्या टप्प्यातील सर्व तयारीनिशी जोरदार मोहीम सुरू आहे. बचावकार्यात पाऊस हा मुख्य अडसर ठरत आहे. पण काही दिवसांत ही मोहीम पूर्ण करण्याचा विश्‍वास गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टनाकार्न यांनी व्यक्त केला आहे.

अशी सुरू आहे सुटका
मुले अडकलेल्या ठिकाणापासून गुहेचे प्रवेशद्वार हे चार किलोमीटर अंतरावर आहे. या चार किलोमीटरच्या अंतरात चार ठिकाणी पाणी भरले आहे. या चारही ठिकाणातून पाण्यातून पूर्ण मास्क लावत मुलांना बाहेर काढावे लागणार आहे. एक पाणबुडा मुलाला आधार देत मुलाचा ऑक्सिजनचा सिलिंडर हातात धरेल. मागील पाणबुडा त्यांना मार्गदर्शन करेल. त्यांच्यावर नजर ठेवेल. दोघेही पाणबुडे पूर्वी नेलेल्या दोरी किंवा केबलचा आधार घेत बाहेर येतील. प्रवेशद्वारापासून अर्धा किलोमीटर अंतरावर या मोहिमेतील सर्वात कठीण मार्ग आहे. तेथील अपुऱ्या जागेतून पाणबुडा कसाबसा बाहेर येऊ शकते. पण सिलिंडरचा काय करायचे, असा प्रश्‍न जवानांना सतावत आहे.

एक नजर                                                                                            मोहिमेत ९० पाणबुडे सहभागी. ४० थायलंडमधील, ५० परदेशातील. मुलांना वाचविण्यासाठी गेलेल्या पाणबुड्याचा ऑक्सिजनअभावी मृत्यू एका मुलाला वाचविण्यासाठी दोन पाणबुडे तैनात गुहेच्या दरवाजापाशी दहा अँब्युलन्स. एक हेलिकॉप्टरही दिमतीला.

चार किलोमीटर दूर
गुहेच्या प्रवेशद्वारापासून मुले चार किलोमीटर अंतरावर अडकली आहेत. तेथे मिट्ट काळोख आहे. वातावरण थंड आहे. मुले थकली आहेत. मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुलांचे मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुले उपाशी आहेत. त्यामुळे त्यांनी खायला काही तरी द्या, अशी मागणी करत आहेत.

‘आई, बाबा आम्ही सुरक्षित आहोत’
(मुलांनी आपल्या पाल्यांना लिहिलेली मन हेलावून टाकणारी पत्रे अशी)
  प्रशिक्षक एक्कापॉल : सर्व पालकांनो, आता मुलं सुखरूप आहेत. मी सर्व पालकांची माफी मागतो. रेस्क्‍यू टीम आमची काळजी घेत आहेत.                                       टॅन (टोपणनाव) : आई-बाबा काळजी करू नका. मी इथ सुखरूप आहे.
पाँग : आई-बाबा, मी तुमच्यावर प्रेम करतो. मी इथे सुरक्षित आहे.                        निक : आई-बाबा, मला बाहेर आल्यावर मकाथा (बार्बेक्‍यूचा एक प्रकार) खायचा आहे. 
मिक : आई-बाबा, माझी इथं योग्य काळजी घेतली जात आहे... माझं सर्वांवर प्रेम आहे.
डॉम : वातावरण थोडं थंड आहे. माझ्या बर्थ डेला पार्टी द्या.
अडॉल : आमची काळजी करू नका. मला सर्वांची आठवण येते. लवकर घरी यावेसे वाटते.
नाईट, टर्न, ब्यू आणि टी : आई-बाबा, काळजी करू नका. मी इथं आनंदात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thailand rescue operation