esakal | प्रजाती होतायत नष्ट; पर्यावरण बदलाचा परिणाम प्राण्यांच्या जननक्षमतेवर
sakal

बोलून बातमी शोधा

प्रजाती होतायत नष्ट; पर्यावरण बदलाचा परिणाम प्राण्यांच्या जननक्षमतेवर

मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रजाती होतायत नष्ट; पर्यावरण बदलाचा परिणाम प्राण्यांच्या जननक्षमतेवर

sakal_logo
By
विनायक होगाडे

कॅनबेरा : मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता (animal fertility) कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील रासायनिक घटक हे यामागील प्रमुख कारण असले तरी प्राण्यांमधील जननक्षमतेवर पर्यावरण बदलाचाही (environmental change) मोठा परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. (The impact of environmental change on animal fertility is one of the reasons behind the extinction of species)

तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास, उष्णता सहन न झाल्याने प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, अशा प्रकारच्या तापमानात काही प्रजातींमधील नरांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे आमच्या संशोधनातून दिसून आल्याचे मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले. त्यामुळे प्रजातींचे अस्तित्व हे ते कोणत्या तापमानात टिकून राहतात यापेक्षा कोणत्या वातावरणात ते पुनरुत्पादन करू शकतात, यावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. हा शोध अत्यंत महत्त्वाचा असून प्रजाती नष्ट होण्यामागे तापमान हे एक कारण असू शकते. तसेच, पर्यावरण बदलाचा प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांबाबतही अधिक अभ्यास आवश्‍यक असल्याचे यामुळे दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: कोरोना शिरू नये म्हणून काढली धार्मिक मिरवणूक; 83 जणांना अटक

तापमानवाढीमुळे काही किटकांमधील आणि मधमाश्‍यांच्या काही प्रजातीमधील जननक्षमता नष्ट झाल्याची उदाहरणेही संशोधकांनी दिली. तसेच, गोवंशीय जनावरे, डुक्कर, मासे आणि पक्ष्यांमध्येही तापमानवाढीमुळे जननक्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या तापमानवाढीचा जैववैविध्यावर कसा परिणाम होतो, यावर संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे.

घरमाश्‍यांवर प्रयोग

घरमाश्‍यांच्या ४३ प्रजातींवर अभ्यास करून ब्रिटन, स्वीडन आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एक अहवाल आज प्रसिद्ध केला. या प्रजातींमधील नर माश्‍यांना वेगवेगळ्या तापमानाखाली चार तास ठेवण्यात आले. अधिक तापमानात जननक्षमता कमी होत असल्याचे यावेळी आढळून आले. अधिक तापमानामुळे ४३ पैकी ११ प्रजातींची ८० टक्के जननक्षमता कमी झाल्याचे दिसून आले. या अभ्यासाचा आधार घेऊन या मुद्द्यावर अधिक प्रमाणात संशोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.