esakal | कोरोना शिरू नये म्हणून काढली धार्मिक मिरवणूक; 83 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना शिरू नये म्हणून काढली धार्मिक मिरवणूक; 83 जणांना अटक

कोरोना शिरू नये म्हणून काढली धार्मिक मिरवणूक; 83 जणांना अटक

sakal_logo
By
विनायक होगाडे

हिम्मतनगर : देशात सध्या कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये चिंतेचं तसेच भीतीचं वातावरण आहे. देशातील अनेक भागांमध्ये लोक देव आणि धर्माला शरण जात अंधश्रद्धेतून काही प्रकार करताना पाहायला मिळत आहेत. याआधी तमिळनाडूमध्ये देखील अशीच घटना समोर आली आहे. कोईमतूर जवळील इरुगुर येथे कोरोना देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे तर तिकडे यूपीतील अनेक गावांमध्ये कोरोनामाई देवीची पूजा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या पूजाअर्चेत खेडूतांबरोबरच सुशिक्षित मंडळी देखील सहभागी होताना दिसतात. अनेक महिलांनी स्वतःच्या शेतामध्येच कोरोनामाईचे देवालय उभारले असून सकाळी उठल्यापासूनच काही मंडळी पूजा साहित्य घेऊन शेतांमध्ये धाव घेत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर का?

आता गुजरातमधून याचप्रकारची आणखी एक बातमी समोर येत आहे. गावात कोरोना विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून काढण्यात आलेल्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल ८० पेक्षा जास्त नागरिकांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली. साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतीज तालुक्यातील लालपूरमध्ये गेल्या शनिवारी (२२ मे) रोजी हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक विधी करण्यासाठी ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत काही लोकांनी ढोल वाजविले, तर महिलांसह काही जणांनी डोक्यावर कलश घेतले होते. त्यातील पाणी पवित्र असल्याची त्यांची श्रद्धा होती.

हेही वाचा: गुड न्यूज! भारताच्या R व्हॅल्यूमध्ये घट; पहिल्यांदाच घडलं असं

पोलिसांना मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर याचा काल सोमवारी (ता. २४) पत्ता लागला. त्यानंतर ओळख पटलेल्या २८ जणांविरुद्ध आणि शंभरहून जास्त अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर कारवाई सुरु असून कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल गेल्या दोन दिवसांत ८३ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिलांसह सहभागी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी अहमदाबाद जिल्ह्यात या महिन्याच्या प्रारंभी नवापुरा गावात असाच प्रकार घडला होता. त्यात एका धार्मिक मेळाव्यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.