Global : जगभरात ढासळतोय लोकशाहीचा दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

global

जगभरात ढासळतोय लोकशाहीचा दर्जा

कोपेनहेगन : जगभरात सर्वत्र लोकशाहीचा दर्जा ढासळत असून कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठीही अनेक देश लोकशाहीला धरुन नसलेल्या आणि अनावश्‍यक कृती करत आहेत, असा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संस्थेने काढला आहे. अनेक देशांमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पाडले जात असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक साहाय्य संस्थेने (आयआयडीईए) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या संस्थेत ३४ देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. कोरोना काळात विविध देशांनी केलेली परिस्थितीची हाताळणी या मुद्द्यावर संस्थेने सर्वेक्षण केले होते. यानुसार, कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरातील ६४ टक्के देशांनी केलेली कृती ही चुकीची, अनावश्‍यक किंवा बेकायदा होती. ज्या देशांमध्ये लोकशाही नाही, तिथे स्थिती अधिक भयानक आहे. हुकुमशाही देशांनी कोरोना स्थितीचा फायदा उठवत अधिक दडपशाही केल्याने कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे अहवालात म्हटले आहे.

लोकशाहीच्या स्थितीचा हा या अहवालातील प्रमुख भाग आहे. गेल्या दशकभरात लोकशाही प्रक्रियेचे अवमूल्यन होण्याच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली असल्याचे ‘आयआयडीईए’ने म्हटले आहे. विशेष म्हणजे, अशा घटना होणाऱ्या देशांच्या यादीत हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हेनिया यांच्यासह अमेरिकेचाही समावेश आहे. २०२० मध्ये हुकुमशाही असलेल्या देशांची संख्या लोकशाही देशांच्या तुलनेत अधिक झाली आहे. गेल्या दोन वर्षांत चार लोकशाही देशांमध्ये लष्करी बंड किंवा निवडणुकीत हेरफार या कारणांमुळे हुकुमशाही आली आहे.

जनआंदोलनांमध्ये वाढ

जगभरात सरकारविरोधातील आंदोलनांची संख्याही प्रचंड वाढल्याचे ‘आयआयडीईए’ने अहवालात म्हटले आहे. कोरोना काळात जनतेच्या संचारावर अनेक निर्बंध असतानाही ८० देशांमध्ये सरकारविरोधात आंदोलने झाली. बेलारुस, क्युबा, इस्वातिनी, म्यानमार आणि सुदानमध्ये अशी आंदोलने सरकारने क्रूरपणे मोडून काढली. अहवालानुसार, आशियामध्ये अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि म्यानमारची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे. भारत, फिलीपीन्स आणि श्रीलंकेतही लोकशाहीचा दर्जा घसरला आहे. चीनमध्येही एकाधिकारशाही वाढत आहे.

जगभरातील लोकशाही देशांनी अधिक कणखर होत स्वत:चे सामर्थ्य वाढविण्याची वेळ आली आहे.

- केव्हिन झामोरा,

सरचिटणीस, आतआयडीईए

शासनयंत्रणा आणि देशांची संख्या

लोकशाही : ९८

मिश्र : २३

हुकूमशाही : ४४

loading image
go to top