कोरोना व्हायरसमुळे चीनमधील मृतांची संख्या हजारवर

पीटीआय
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

नवजात बालिकेला धोका नाही
कोरोना विषाणूची लागण झालेल्या ३३ वर्षांच्या गर्भवतीने सोमवारी (ता. १०) मुलीला जन्‍म दिला. या बाळाची प्रकृती ठणठणीत असून, त्याला विषाणूची लागण झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. वायव्य चीनमधील शांकशी प्रांतातील या महिलेची प्रसूती ३७व्या आठवड्यात शस्त्रक्रियेने झाली. जन्मलेल्या बालिकेचे वजन २ हजार ७३० ग्रॅम आहे. तिची कोरोना व्हायरसची चाचणी केली असता तिच्यात या विषाणूचे संक्रमण झाले नसल्याचे आढळून आले. या बाळाला स्वतंत्र कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, काही दिवसांनी त्याची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय प्रशासन विभागाचे संचालक लिऊ मिंग यांनी दिली.

जगभरात फैलाव

  • चीनव्यतिरिक्त अन्य देशांमध्ये ३५० जणांना संसर्ग
  • हाँगकाँगमध्ये एकाचा मृत्यू, तर ४२ जणांना लागण
  • मकाऊमध्ये १०, तैवानमध्ये ‘कोरोना’चे १८ रुग्ण
  • फिलिपिन्समध्ये एकाचा मृत्यू
  • जर्मनी, ब्रिटन, इटलीसह फ्रान्स, रशिया, बेल्जियम, स्वीडन, फिनलंड आणि स्पेन आदी युरोपीय देशांमध्ये लागण
  • चीनमधून येणाऱ्यांवर बहुतेक देशांमध्ये प्रवेशबंदी
  • चीनला जाणारी विमानसेवाही स्थगित

बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे बळी पडलेल्यांची संख्या हजारवर पोचली आहे. या विषाणूची लागण होऊन आत्तापर्यंत एक हजार १६ जणांचा मृत्यू झाला आहे. हुबेई प्रांतात सोमवारी (ता. १०) एका दिवसात १०८ बळींची नोंद झाली. एकूण ४२ हजार ६३८ जणांना याचा संसर्ग झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही साथ नियंत्रणात आणण्यात मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) आंतरराष्ट्रीय पातळीवरील पथक बीजिंगला पोचले आहे. काल नोंद झालेल्या १०८ मृतांमध्ये १०३ जण हुबेई प्रांतातील आहेत. या आजाराचा फैलाव वुहानमधून बीजिंग, तिआनजिन, हेलाँगजिआंग, अन्हुई आणि हेनानमध्येही झाला असून, तेथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ‘झिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या हवाल्याने दिली आहे.

‘कोरोना’चा संसर्ग झालेल्या तीन हजार ९९६ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. सात हजार ३३३ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, २१ हजार ६७५ जणांना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 
कोरोना व्हायरसच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवण्यास चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’च्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक काल रात्री चीनला पोचले आहे. सार्वजनिक आरोग्य आपत्तीविषयातील ज्येष्ठ तज्ज्ञ ब्रुस एलवॉर्ड हे पथकाचे प्रमुख आहेत. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्ती आणि तज्ज्ञांचा गट आणि चीनचे अधिकारी या संकटाची माहिती घेऊन मार्गदर्शन करणार आहेत, असे ‘पीपल्स डेली’ या वृत्तपत्राने नमूद केले.

‘कोरोनावर विजय मिळवू’
परिस्थिती गंभीर असली, तरी चीन या साथीवर विजय मिळवील, असा विश्‍वास चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी काल व्यक्त केला.

कोरोना व्हायरसच्या उद्रेक, त्यामुळे झालेली जीवित हानी, त्यावरील नियंत्रण, यावर सखोल चर्चा करण्यासाठी चीन आणि ‘डब्ल्यूएचओ’च्या तज्ज्ञांची संयुक्त समिती स्थापन करणार आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित उपायांबद्दल या समितीमार्फत चीन व अन्य बाधित देशांना सल्ला दिला जाईल.
- मी फेंग, राष्ट्रीय आरोग्य समितीचे अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands die in China due to corona virus