चीनमध्ये ‘कोरोना’चा बळींचा आकडा तीनशेवर

पीटीआय
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, आत्तापर्यंत या विषाणूमुळे ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार ३८० जणांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोग (एनएचसी)ने दैनंदिन अहवालात दिली आहे.

बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, आत्तापर्यंत या विषाणूमुळे ३०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार ३८० जणांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोग (एनएचसी)ने दैनंदिन अहवालात दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणारे सर्वजण हुवेई प्रांतातील असल्याचेही एनएचसीने नमूद केले आहे. त्याचबरोबर शनिवारी चार हजार ५६२ नवीन रुग्ण आढळल्याचेही म्हटले आहे. त्यापैकी ८५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रुग्णालयातील २ हजार ११० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

फिलिपिन्समध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू
दरम्यान, फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला आहे. फिलिपिन्समधील मृत व्यक्ती 
चीनमधील वुहान शहरात राहत असल्याचे उघड झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील फिलिपिन्सचे प्रतिनिधी रवींद्र अबेयासिंघे यांनी कोरोना संसर्गामुळे चीनबाहेर मृत होणारी ही पहिली व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.

ई-व्हिसा भारताकडून स्थगित
चीनमधून येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसा सुविधा भारताने तूर्त थांबवली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडामोडींमुळे ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर तूर्त बंदी घालण्यात आली आहे, अशी घोषणा भारतीय दूतावासाने केली आहे. चीनचे पासपोर्टधारक आणि चीनमध्ये राहणारे अन्य देशाचे नागरिक यांना ही बंदी लागू असेल. ज्यांना यापूर्वीच ई-व्हिसा मिळाला आहे, त्यांचा ई-व्हिसा वैध नसेल, असेही दूतावासाने रविवारी जाहीर केले.

नजर कोरोनावर...
     चीनमध्ये ३२८ रुग्णांवर उपचार करून घरी सोडले
     एक लाख ६३ हजार ८४४ जण रुग्णांच्या संपर्कात असल्याने वैद्यकीय निगराणीखाली
     आठ हजार ४४ संशयितांवर यशस्वी उपचार
     व्हेनझोऊ शहरात घराबाहेर पडण्यावर बंदी

‘कोरोना’चा धोका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred of Corona victims in china