व्यापार युद्धाची तीव्रता वाढणार

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

डोनाल्ड ट्रम्प इतर देशांच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारत असल्याने अमेरिकेतील शेअर बाजार कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले, ""बाजार कोसळत असेल, तर कोसळू दे. मी हे निर्णय राजकारण करण्यासाठी घेत नाही.'' 

वॉशिंग्टन : चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्वच वस्तूंवर गरज पडल्यास जादा कर आकारण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ""चीमधून अमेरिकेत 2017 मध्ये 505.5 अब्ज डॉलरच्या उत्पादनांची आयात झाली होती. या सर्वच आयातीवर जादा कर आकारणी करण्याची माझी तयारी आहे. हे केवळ राजकारणासाठी मी करीत नाही. आपल्या देशासाठी जे योग्य आहे, त्याच गोष्टी मी करीत आहे. चीनमधून येणाऱ्या उत्पादनांमुळे आपल्या देशाला खूप काळापासून मोठा फटका बसलेलला आहे.'' 

या महिन्याच्या सुरवातीला अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या 34 अब्ज डॉलर किमतीच्या उत्पादनांवर जादा कर आकारणी केली आहे. याला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या तेवढ्याच किमतीच्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. अमेरिकेने जादा कर आकारणी केल्याने याला प्रत्युत्तर म्हणून युरोपीय समुदाय, कॅनडा, मेक्‍सिको आणि तुर्कस्तान यांनी अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. याला जागतिक व्यापार संघटनेत (डब्लूटीओ) आव्हान देण्यात आले आहे. 

...तर शेअर बाजार कोसळू दे! 

डोनाल्ड ट्रम्प इतर देशांच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारत असल्याने अमेरिकेतील शेअर बाजार कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले, ""बाजार कोसळत असेल, तर कोसळू दे. मी हे निर्णय राजकारण करण्यासाठी घेत नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trade intensity will increase