360 वर्षांपूर्वी समुद्रात मौल्यवान खजिन्यासह बुडाले होते जहाज; खजिना सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

treasure

360 वर्षांपूर्वी समुद्रात मौल्यवान खजिन्यासह बुडाले होते जहाज; खजिना सापडला

नवी दिल्ली - इतिहासात समुद्रात अनेक जहाज बुडाण्याच्या घटना घडल्या आहेत. 4 जानेवारी 1656 रोजी देखील एक स्पॅनिश जहाज क्युबाहून सेव्हिलला जात असताना बहामासमधील 'लिटल बहामा बँक' जवळ एका खडकाला धडकून अवघ्या 30 मिनिटांत बुडाले होते. जहाजात खूप मोठ्या प्रमाणात मौल्यवान खजिना होता. आता या खजिन्याचा काही भाग समुद्रात सापडला आहे. (treasure buried in sea news in marathi)

खजिना शोधणार्‍यांनी दावा केला की, समुद्राखाली अजून बऱ्याच गोष्टी असू शकतात. तब्बल 360 वर्षानंतर जहाज शोधणे आव्हानात्मक होते. शिवाय जहाज बुडाल्यानंतर त्याचे अवशेष अनेक किलोमीटरपर्यंत पसरले होते.

या जहाजाचे वजन 891 टन होते. या जहाजातून 650 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी केवळ 45 लोकांना वाचविण्यात यश आलं होतं. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या रिपोर्टनुसार या जहाजात 3.5 दशलक्ष सोने-चांदीचे नाणी आणि दागिने होते. त्यापैकी 1656 ते 1990 च्या सुरुवातीच्या काळात फक्त 8 नाणी सापडली होती.

अ‍ॅलन एक्सप्लोरेशनचे संस्थापक कार्ल अ‍ॅलन यांनी 'फॉक्स न्यूज डिजिटल'ला दिलेल्या मुलाखतीत या जहाज आणि खजिन्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. कार्ल अ‍ॅलन यांनी सांगितले की त्यांनी आणि त्यांच्या टीमने जुलै 2020 मध्ये वॉकर के आयलँडजवळ मौल्यवान कलाकृतींचा शोध सुरू केला होता. हे बेट बहामाच्या उत्तरेस आहे. यासाठी हाय रिझोल्युशन मॅग्नोमीटर, जीपीएस, मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला होता.

अ‍ॅलन पुढं म्हणाले की, जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी त्यांनी बहामा सरकारची परवानगी घेतली होती. बहामाच्या उत्तरेकडील भाग शोधण्यासाठी. हा भाग जहाजाच्या भग्नावस्थेचे ठिकाण होते. येथे शोध सुरू झाला तेव्हा अनेक अभूतपूर्व गोष्टी समोर आल्या.

चांदी आणि सोन्याची नाणी सापडली

कार्ल अ‍ॅलन यांनी सांगितले की, जहाजाच्या शोधात पन्ना, नीलम अशी रत्न, टोप, 3000 चांदीची नाणी आणि 25 सोन्याची नाणी सापडली. चायनीज पोर्सिलेन, लोखंडी साखळ्याही सापडल्या. चांदीच्या तलवारीचे हँडलही सापडले. तसेच चार पेंडंट, धार्मिक चिन्हेही आढळून आली. तसेच 887 ग्रॅम वजनाची सोन्याची चेनही सापडली.

अ‍ॅलन एक्सप्लोरेशनचे पुरातत्वशास्त्रज्ञ जिम सिंक्लेअर यांनी सांगितले की, समुद्राच्या आत सापडलेल्या या कलाकृतीवरून पूर्वी लोक कोणत्या प्रकारच्या सोन्याच्या वस्तू वापरायचे हे समजलं. तसेच या गोष्टी मिळाल्यामुळे इतिहास आणि मानवी वर्तन समजून घेणे सोपे जाईल, असंही त्यांनी म्हटलं.

अ‍ॅलन एक्सप्लोरेशनचे प्रवक्ते बिल स्प्रिंगर म्हणाले की, त्यांची संस्था कोणतीही वस्तू विकत नाही किंवा लिलाव करत नाही. सापडलेल्या गोष्टी अमूल्य आहेत. या सर्व वस्तू संग्रहालयाचा भाग असतील आणि बहामास मेरीटाईम म्युझियम ऑफ अ‍ॅलन एक्सप्लोरेशनमध्ये ठेवल्या जातील. हे संग्रहालय फ्रीपोर्टमधील पोर्ट लुकाया मार्केटप्लेसमध्ये आहे.