डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली किम जोंग यांची भेट

पीटीआय
सोमवार, 1 जुलै 2019

डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियात प्रवेश करत त्यांचे प्रमुख किम जोंग उन यांची भेट घेतली.

पान्मुन्जोम (दक्षिण कोरिया) : उत्तर कोरियाच्या भूमीत प्रवेश करणारे पहिले अमेरिकी अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इतिहास रचला. ट्रम्प यांनी काल (ता. 29) अचानक भेटीचे निमंत्रण दिल्यानंतर या घटनेकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. 
अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने घडलेल्या या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियात प्रवेश करत त्यांचे प्रमुख किम जोंग उन यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी किम यांना उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमारेषेवर असलेल्या शांतता क्षेत्रात आणत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र धोरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

तसेच, किम यांना अमेरिकेचे निमंत्रण देण्यास कधीही तयार आहे, त्यांना इच्छा असेल तेव्हा त्यांना बोलावू, असेही ट्रम्प या भेटीनंतर म्हणाले. सीमारेषेवर ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या या "शांततेच्या हस्तांदोलना'तून भूतकाळ विसरून पुढे जाण्याची आमची इच्छा दिसून येत असल्याचे किम म्हणाले. उत्तर कोरियाची अण्वस्त्रे नष्ट करण्याबाबत ट्रम्प आणि किम यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या सिंगापूरमधील बैठकीनंतर नंतर दोन्ही देशांत पुन्हा वाद निर्माण झाला होता. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर दोन ते तीन आठवड्यांत चर्चा सुरू होईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या भेटीनंतर सांगितले. 

जी-20 परिषदेनंतर दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जाताना ट्रम्प यांनी "किम जोंग उन सीमारेषेवर भेटायला आले, तर आपण उत्तर कोरियात प्रवेश करू,' असे ट्विट केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump and Kim agree to restart talks in historic meeting