ट्रम्प म्हणे, मी हिंसेने व्यथित, US कायद्याचं राज्य; सत्तेचे सुव्यवस्थित करेन हस्तांतरण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की 20 जानेवारी रोजी कायद्यानुसार जो बायडन यांच्याकडे सत्तेचे हस्तांतरण केले जाईल.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कॅपिटलवर बुधवारी झालेल्या हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी म्हटलंय की, सर्व अमेरिकेन नागरिकांप्रमाणेच मी देखील हिंसा, अराजकता आणि झालेल्या झटापटीवर नाराज आहे. इमारतीला सुरक्षित करण्यासाठी आणि घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी मी लगेचच नॅशनल गार्ड आणि फेडरल लॉ इन्फोर्समेंटच्या अधिकाऱ्यांना तैनात केलं. अमेरिका हे कायदा आणि सुवस्थेचं राष्ट्र आहे आणि ते तसेच राहिलं पाहिजे. 

ट्रम्प यांनी पुढं म्हटलं की, आता काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल औपचारिक रित्या घोषित केला आहे. 20 जानेवारी रोजी एका नव्या प्रशासनाची सुरवात होईल. माझे लक्ष आता सत्तेचे सहज, सुव्यवस्थित आणि अखंड सत्तेचे हस्तांतरण करण्याकडे आहे. अमेरिकेमध्ये हिंसेच्या दरम्यानच काँग्रेसने डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांच्या विजयावर मोहोर उमटवली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना 306 इलेक्टोरल कॉलेज व्होट्स मिळाले आहेत, जे बहुमताचा पार आहेत. राष्ट्राध्यक्ष पदासाठी केवळ 270 व्होट्सची गरज असते. काँग्रेसच्या या मंजूरीनंतर बायडन आता अधिकृतरित्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ठरतील.

या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की 20 जानेवारी रोजी कायद्यानुसार जो बायडन यांच्याकडे सत्तेचे हस्तांतरण केले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की, ते निवडणुकीच्या निकालावर सहमत नाहीयेत. मात्र, तरीही ते सत्तेचे  हस्तांतरण सुस्थितीत करतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव तर स्विकारला नाहीये तसेच त्यांनी या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे.

हेही पहा - अमेरिकेतील US Capitol मध्ये नेमकं काय आणि का घडलं?

काँग्रेसच्या शिक्कामोर्तबीनंतर डेमोक्रेटीक पक्षाचे जो बायडन यांना आता 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी शपथ दिली जाईल. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांनी गुरुवारी घोषणा केली की काँग्रेसने अमेरिकेच्या निवडणुकीत बायडन यांना विजयी दाखवणाऱ्या सर्व इलोक्टोरल कॉलेज व्होट्सच्या आकडेवारीची खात्री केली आहे. याआधीच वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी जोरदार हल्लाबोल केला. कॅपिटल हिलमध्ये इलेक्टोरल कॉलेजची प्रक्रिया सुरु होती, ज्या अंतर्गत जो बायडन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार होतं. या दरम्यानच हजारोंच्या संख्येने ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये मोर्चा काढत कॅपिटल हिलवर चढाई केली. या आंदोलकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सत्ता द्या तसेच परत मतांची मोजणी करा अशी मागणी केली गेली. या एकूण गोंधळात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump says Like all Americans, I am outraged by the violence lawlessness & mayhem