
Turkiye floods : भूकंपानंतर तुर्कस्तानमध्ये आणखी एक आपत्ती; अनेक शहरे पुराने वेढली
नवी दिल्ली - तुर्कस्तानमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली होती. हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आता तुर्कीतील लोक आणखी एका आपत्तीशी झुंज देत आहेत. समुद्राला लागून असलेल्या या देशाच्या दक्षिण भागात पूर आला आहे.
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतांतील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून अनेक शहरांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.
तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, सनलियुर्फा आणि अदियामान प्रांतात पूर आला आहे. भूकंपाचा मोठा फटका बसलेल्या ११ प्रांतांमध्ये या दोन प्रांतांचा समावेश आहे. दुर्दैवाने पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर अनेकांचा शोध सुरू आहे.
६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्तान आणि त्याचा शेजारील देश सीरियाला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. यात ५५,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर 6 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. ही आपत्ती इतकी भीषण होती की हजारो इमारती पत्यांसारख्या कोसळल्या होत्या.