ट्रम्प यांना ट्विटरचा दणका; कॉपी-पेस्ट आणि खोट्या माहितीमुळे हटवल्या पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न असल्याने ट्रम्प यांचे ट्विट हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले.

वॉशिंग्टन - कोरोना संसर्गाबाबत खातरजमा न झालेल्या माहितीचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रीट्विट करताच ट्वीटरकडून ते डिलीट करण्यात आले. खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न असल्याने ट्रम्प यांचे ट्विट हटवण्याची कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले. कोरोनाचा धोका कमी असून केवळ अमेरिकेत केवळ सहा टक्के प्रत्यक्ष या विषाणूमुळे दगावले असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला होता. क्यूअॅनॉन (QAnon) या प्रवादाचा समर्थक असलेल्या आणि मेलक्यू (Mel Q) असे युझरनेम असलेल्या अकाउंटमधूने हे ट्विट करण्यात आले होते.

काय होते ट्विट
ट्विटमध्ये असलेली माहिती फेसबुक पोस्टवरून कॉपी करण्यात आलेली होती. यामध्ये रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेकडून माहितीचा दावा करण्यात आला होता. संबंधित संस्थेनं कोरोना आकडेवारी गुपचूप बदलल्याचा दावा केला होता. यामध्ये नव्या आकडेवारीनुसार आधीच्या अधिकृत आकडेवारीतील केवळ सहा टक्के बळी प्रत्यक्ष कोरोना विषाणूमुळे झाल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार हा आकडा साधारण नऊ हजारच्या घरात जातो. अन्य मृतांना कोरोनाशिवाय इतर दोन-तीन प्रकारचे गंभीर आजार असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

हे वाचा - अमेरिकेचा कोरोनाच्या लसीबाबत मोठा निर्णय! जगाच्या चिंतेत वाढ

खरंतर या संस्थेने अशी माहिती 26 ऑगस्ट रोजी दिली, पण तेव्हाच उर्वरित 94 टक्के बळी कोरोनाचे नाहीत असे म्हणणे चुकीचे असल्याचेही स्पष्ट केले होते. आता केवळ नऊ हजार बळींमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था बंद ठेवणे योग्य आहे का असा सवाल विचारण्यात येत होता. ट्रम्प यांच्या स्वतःच्या कोरोना कार्यदलावर टीका करणे अयोग्य असल्याचा दावा करणाऱ्या लेखाचीही लिंक यामध्ये होते. या लिंकमध्ये कोरोना विषाणूला चायना कोरोना व्हायरस असं म्हटलं होतं. 

क्यूअॅनॉनविषयी
सैतानावर श्रद्धा असलेल्या आणि लैंगिक शोषणासाठी मूलांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात पंथाविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प कारवाई करणार असल्याचा दावा प्रामुख्याने सोशल मिडीयावरून केला जात आहे. त्यास क्यूअॅनॉन असे संबोधले जाते. सुरक्षा संस्थेला तशी माहिती मिळाली असून कारवाईसाठी हिरवा कंदील दर्शविण्यात आल्याचा दावा केला जातो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाइट हाउसकडून समर्थन
ट्रम्प यांच्या रीट्विटचे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव कायली मॅकेनानी यांनी समर्थन केले. नोंद घेण्यासारखी माहिती देणे इतकाच ट्रम्प यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

विस्कॉन्सीन-मॅडीसन विद्यापीठाच्या
संसर्गजन्य विकार विषयाच्या प्राध्यापक नसिया सफदर यांनी सांगितले की, मृत्यू प्रमाणपत्रावर श्वसनविकार, मूत्रपिंड बिघाड किंवा इतर कारणांचा उल्लेख असू शकतो, पण कोरोना विषाणू हे मृत्यूचे कारण कायम राहते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter remove donald trump retweet copy paste and false info