Two nation village : या गावातले लोक एकाचवेळी राहातात दोन देशांत; कसं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two nation village

Two nation village : या गावातले लोक एकाचवेळी राहातात दोन देशांत; कसं ?

मुंबई : एक गाव आणि दोन देश. गावातल्या घरांचा काही भाग एका देशात आणि उर्वरित भाग दुसऱ्या देशात. गावातली काही मुलं या देशातल्या शाळेत जातात तर काही मुलं त्या देशातल्या शाळेत जातात. हे गाव म्हणजे भारत आणि म्यानमारच्या सीमेवरचं लोंगवा गाव. नागालँड राज्यात ते आहे.

लोंगवामध्ये मुख्य राजाचा, 'आंग'चा राजमहाल आहे ज्याला भारत आणि म्यानमारची आंतरराष्ट्रीय सीमारेषा विभागते. या महालाचा एक भाग भारतात आहे आणि एक म्यानमारमध्ये. हे वैशिष्ट्य केवळ या एका घराचंच नाही तर सगळ्या लोंगवाचंच आहे. जवळपास पाच हजार वस्तीच्या या गावातली ७४२ घरं ही भारतात आहेत आणि २२४ घरं म्यानमारमध्ये आहेत.

"साधारण 15-16व्या शतकात आमचं राज्य स्थापन झालं होतं. हा महाल तर 100 वर्षांहून अधिक जुना आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तर अगदी अलीकडे, 1971 मध्ये आली," इथले राजा अमोऊ तैवांग सांगतात. ते मुख्य राजाचे काका आहेत.

राजघराण्यातल्या सर्व पुरुषांना राजा म्हणजेच 'आंग' मानलं जातं. अरूणाचलच्या एका खेड्यातून या राजघराण्याचे पूर्वज इथं आले आणि त्यांनी लोंगवाची स्थापना केली. या राजघराण्याची 'नानवांग' आणि 'तैवांग' अशी दोन कुळं झाली. कालौघात मुख्य राजाचं पद 'तैवांग' कुळाकडे आलं, जे आजंही कायम आहे आणि याच कुळाचं राजघराणं या महालात आजही राहातं.

नागालॅण्ड जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर बऱ्याच काळानं चर्चा होऊन विशेष दर्जा मिळाल्यावर 1960मध्ये भारतात आला. त्यानंतरही अनेक वर्षं म्यानमारसोबत आंतरराष्ट्रीय सीमारेषा अंतिम झाली नव्हती. ती झाली 1971मध्ये आणि जेव्हा ती आखली गेली तेव्हा लोंगवाचं आयुष्यच बदलून गेलं.

ती रेषा त्यांच्या राजाच्या घराला आणि सगळ्या गावालाच विभागून गेली. प्रश्न पडला, की करायचं काय ? नेमकं कुणीकडे जायचं. पण लोंगवाचा प्रश्न चिघळला नाही. याचं कारण एक म्हणजे इथल्या लोकांची भावना अजूनही ही आहे ते त्यांच्या जुन्या संस्थानातच राहात आहेत आणि दुसरं म्हणजे भारत असो वा म्यानमार, दोन्ही देशांनी सीमारेषा उभारली तरीही लोंगवावर ताबा करण्याचे मनसुबे केले नाहीत. दोघांनीही या गावाला स्वातंत्र्य दिलं आणि म्हणूनच ते 'टू नेशन व्हिलेज' झालं.

लोंगवातल्या लोकांना भारत आणि म्यानमार दोन्ही देशांमध्ये मुक्त प्रवेश आहे. ते दोन्हीकडे व्यापार करतात. रोटी-बेटी व्यवहार सीमारेषा ओलांडून होतात आणि दोन्ही बाजूंच्या मुली दुसऱ्या बाजूच्या सुना होतात. कित्येक जण दुसऱ्या बाजूला दिवसभर नोकरी करतात आणि संध्याकाळी लोंगवा मध्ये परत येतात.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही देशांची सरकारं या गावासाठी काही ना काही करत असतात. इथले स्थानिक भारताचे नागरिक आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत, ते इथे मतदान करतात. म्यानमारही त्यांना आपलंच म्हणतं.

नागालॅण्ड सरकारतर्फे इथे दोन शाळा तर आधीपासूनच आहेत, पण आता काही वर्षांपासून म्यानमार सरकारनंही इथं एक बर्मीज भाषेतली शाळा सुरू केली आहे. इथे म्यानमारमधून येऊन शिक्षक शिकवतात.

भारतीय लष्कराचा तळ तर इथेच आहेच आणि त्यांची कडक गस्तही या सीमेवर असते, पण त्यासोबतच म्यानमारच्या लष्करातले जवानही या भागात असतात. पण इतर कोणत्याही दोन देशांच्या सीमेवर लष्कराच्या गस्तीत अनुभवायला मिळतो तसा तणाव इथे अजिबात दिसत नाही.

काही वर्षांपूर्वी जेव्हा स्वतंत्र नागालॅण्डची सशस्त्र चळवळ सुरु होती तेव्हा या प्रदेशावर सतत हिंसेचं सावट असायचं. पण 2000साली शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर शांतता आली. आता लोंगवाचं हे सीमारेषेनं दुभंगण्याचं वैशिष्ट्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आकृष्ट करतं. कोणीही इथं येऊ शकतं, या कोन्याक नागांचा राजमहाल पाहू शकतं आणि सीमारेषा संस्कृतीला कशी दुभंगू शकत नाही याचा अनुभव घेऊ शकतं.