esakal | कोरोना प्रतिबंधकऐवजी दिलं कुत्र्याचं इंजक्शन; धक्कादायक प्रकार उघडकीस

बोलून बातमी शोधा

Vaccine
कोरोना प्रतिबंधकऐवजी दिलं कुत्र्याचं इंजक्शन; धक्कादायक प्रकार उघडकीस
sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. अद्याप या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, या विषाणू विरोधात प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या लसी संपूर्ण जगभरात तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे देशातही सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत अनेकांनी कोरोनावरील लस घेतली आहे. परंतु, चिलीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. कोरोनाची लस असल्याचं सांगून एका डॉक्टराने चक्क नागरिकांना कॅनाइनचं (कुत्र्यांचं इंजक्शन) इंजक्शन दिलं आहे. याप्रकरणी संबंधित पशुवैद्यांवर कारवाई केली आहे.

चिलीमधील कलमा शहरात मारिया फर्नांडा मुनोज यांच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नागरिकांना कोरोनाची लस म्हणून कॅनाइनचं इंजक्शन देण्यात येत असल्याची माहिती एंटोफगास्टा प्रांताचे उप आरोग्य सचिव रोक्साना डिआज यांच्या टीमला मिळाली. या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाची टीम घटनास्थळावर हजर झाली व संबंधित प्रकार समोर आला.

हेही वाचा: कोरोनाच्या भीतीमुळे वडिलांना सोडलं भररस्त्यात; हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणी मुनोज यांना १०, ३०० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दंड ठोठावल्यानंतरही मनोज यांनी ही उपचार पद्धती योग्य असल्याचा दावा केला आहे. कॅनाइनचं इंजक्शन घेतल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नसून आपण स्वत: व रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांना हे इंजक्शन देण्यात आलं आहे. तसंच या इंजक्शनमुळे कोणत्याही व्यक्तीला अपाय झालेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाऐवजी कॅनाइनचं लसीकरण करणं अत्यंत घातक आहे, असं रोक्साना डिआज यांनी म्हटलं आहे. कलमाप्रमाणेच कारलोस पारडो येथेदेखील असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पारडो येथील व्यक्तीला ९२०० डॉलरचा दंड ठोठावला आहे.