"यूएईने मुस्लिम जगताचा विश्वासघात केला"

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 1 September 2020

इराणचे सर्वोच्च नेता अयातोल्ला अली खामेनी यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) टीकास्त्र सोडले आहे.

तेहरान- इराणचे सर्वोच्च नेता अयातोल्ला अली खामेनी यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) टीकास्त्र सोडले आहे. युएईने इस्त्राईलसोबत शांतता करार करुन मुस्लीम जगताचा मोठा विश्वासघात केला असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी यासदंर्भात ट्विट केलं आहे.

संयुक्त अरब अमिरातीने मुस्लीम जगताला, अरब राष्ट्रांना, शेजारी राष्ट्रांना आणि पॅलेस्टिनला धोका दिला आहे, अशी टीका खामेनी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन केली आहे. इराण आणि इस्त्राईलमध्ये कट्टर शत्रूत्व आहे. या दोन देशांच्या मधून विस्तवही जात नाही. यामुळेच खामेनी यांनी यूएईच्या इस्त्राईलच्या मैत्रीच्या निर्णयावर आगपाखड केली आहे. यूएईच्या राज्यकर्त्यांनी झीओनिस्ट लोकांसाठी आपली दारे खुली केली आहेत. त्यांनी पॅलेस्टिन मुद्द्याला पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

चीनने पैंगोगच्या उत्तर भागात जे केलं, तेच भारताने दक्षिणेत करत दिलं प्रत्युत्तर

यूएईने जो विश्वासघात केला आहे, तो जास्त काळ टिकणार नाही. मात्र, हा कलंक त्या देशावर कायमचा असेल. मला आशा आहे की युएई आपली चूक सुधारेल आणि त्यांनी जे काही केलं आहे त्याची नुकसान भरपाई करेल, असंही खामेनी यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटलं आहे. यूएई-इस्त्राईलमध्ये करार झाल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १३ ऑगस्ट रोजी यूएई-इस्त्राईल कराराची घोषणा केली होती.

सोमवारी अमेरिका-इस्त्राईलचे प्रतिनिधी मंडळ पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाने तेल अवीव येथून थेट अबू धाबीत उतरले आहे. त्यानंतर खामेनी यांची तिखट प्रतिक्रिया आली आहे. विशेष म्हणजे हे विमान सौदी अरेबियाच्या भूमितून उडत आलं आहे. सौदीने यासाठी परवानगी दिली होती. 

सौदी अरेबिया आणि इस्लामिक राष्ट्रांमध्ये संबंध ताणले जात असताना यूएईने २०१६ च्या जानेवारीमध्ये इराणपासून अंतर राखणे सुरु केले होते. सौदी अरेबिया आणि इराणचे संबंध बिघडले आहेत. मागील वर्षी गल्फ भागात इराणने हल्ले घडवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. सौदी अरेबिया आणि इराण या दोन बलाढ्य राष्ट्रांनी सीरिया आणि येमेन वादामध्ये परस्परविरोधी भूमिका घेतली आहे.

काय सांगता! कोणतेही औषध न घेता HIV रुग्ण झाला बरा

दरम्यान, यूएई आणि इस्त्राईलमध्ये १३ ऑगस्ट २०२० रोजी शांतता करार झाला. असा करार करणारा यूएई तिसरा अरब राष्ट्र ठरला आहे. याआधी इजिप्त (१९७९) आणि जोर्डन ( १९९४) यांनी इस्त्राईलशी शांतता करार केला आहे. शिवाय यूएई इस्त्राईलसोबत शांतरा करार करणारा पर्शियन गल्फमधील पहिला देश ठरला आहे. या कराराबरोबरच इस्त्राईलने वेस्ट बँकमधील आपले अतिक्रमण थांबवण्याचे मान्य केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये सप्टेंबर महिन्यात हे दोन्ही देश शांतता करारावर सही करण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UAE Betrayed Muslim World With Israel Deal Says Iran Supreme Leader