
पंजाब नॅशनल बँकमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी सध्या भारतातून फरार झाला होता.
लंडन : पंजाब नॅशनल बँकमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी सध्या भारतातून फरार झाला होता. नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आजा गुरुवारी निर्णय दिला. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग कोर्टाने मोकळा केला आहे. कोर्टाने म्हटलं की, नीरव मोदीच्या विरोधात भारतात एक खटला दाखल आहे ज्याचं त्याला उत्तर द्यावं लागेल. कोर्टाने पुढे आपल्या निर्णयात म्हटलं की, नीरव मोदीने पुरावे नष्ट करणे तसेच साक्षीदारांना भीती घालण्याचा कट रचला होता.
कोर्टाने पुढे म्हटलंय की, नीरव मोदीला मुंबईमधील ऑर्थर रोड जेलमध्ये योग्य ते औषधोपचार आणि मानसिक आरोग्यासाठी सुविधा पुरवल्या जातील. नीरवने आपल्या विरोधातील 'एक्ट्रॅडीक्शन' आदेशाला कोर्टात आव्हान दिलं होतं. दोन वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर आज गुरुवारी जिल्हा न्यायाधीश सॅम्यूअल गूजी यांनी निर्णय दिला की, नीरव मोदीच्या विरोधात कायदेशीर खटला आहे, ज्यामध्ये त्याला भारतीय न्यायालयासमोर दाखल व्हावं लागेल.
दोन वर्षांपूर्वी नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी 13 मार्च 2019 रोजी लंडनमधून अटक केली होती. त्यानंतर तो साऊथ वेस्ट लंडनच्या वँड्सवर्थ जेलमध्ये कैद आहे. या सुनावणीसाठी नीरव मोदी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे वँड्सवर्थ जेलसमोर दाखल झाला. आता न्यायालयाच्या निर्णयाला ब्रिटनच्या गृह सचिव प्रीती पटेल यांच्याकडे पाठवलं जाईल. या प्रकरणी हायकोर्टाच्या अपीलला परवानगी द्यायची की नाही, हे त्या ठरवतील.
180 कोटी डॉलरचा मालक
फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये नीरव मोदीची एकूण संपत्ती 180 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 11,700 कोटी रुपये होती. नीरव मोदीच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. मार्च 2018 मध्ये नीरव मोदीने न्यूयॉर्कमध्ये बँकरप्सी प्रोटेक्शनच्या अंतर्गत याचिका दाखल केली होती.